डोंगरयात्रा - किल्ले पुरंदर आणि खंडोबा मंदिर, जेजूरी गड
फेब्रुवारीत सिंहगडावर गेलेलो, परतताना जितू दादा बोलले होते पुढच्या वेळी येतील तेव्हा एक दिवस राहण्याचा प्लॅन करून या... एप्रिल मधे प्लॅन करूया अस ठरवलं... 2/3 आठवड्यापूर्वी दादांचा कॉल आला आणि शेवटचा आठवड्यात 26 आणि 27 तारीख, रविवार, सोमवार हे दोन दिवस फिक्स केले...पुरंदर किल्ला आणि जेजूरीचा प्लॅन झाला...रविवारी जेजूरीला जाऊ आणि सोमवारी पुरंदर किल्ल्यावर... दोघा तिघा कडून समजल की रविवार खंडोबाचा वार, त्या दिवशी गर्दी असणार, मग एक दिवस आधी प्लॅन मधे बदल केला... रविवारी पुरंदर किल्ला आणि सोमवारी जेजूरी... ह्या महिन्यातले पहिल्या 3 आठवड्यातील सुट्टीचे दिवस गणपती मंदिरासाठी देणगी आणि ईतर कामात गेले... ऑफिसला रविवारची सुट्टी सांगून ठेवलेली... पण शनिवारी लवकर निघणार होतो ते सांगितल नव्हत... शुक्रवारी सरांचा कॉल आला की, शनिवारी दुपारी 2 नंतर नायजेरियाच्या एका क्लायंट सोबत zoom मीटिंग होती... आता सर्वच गणित फिस्कटणार होती... शुक्रवारी रात्रीच बॅगा भरुन ठेवल्या... ऑफिस मधून निघायला उशीर झाला तर घरी न येता तिथूनच जाता येईल हा उद्देश.... संध्याकाळी पार्थकडे हळदीला जाता येणार नाही म्हणुन सकाळी ऑफिसला जातानाच भेट घेतली... ऑफिसला पोहोचल्यावर डोक्यात एकच विचार - मीटिंग किती उशिरा पर्यन्त चालेल... कारण मागच्या वेळी त्यांच्या सोबतच्या मीटिंगला अडीच तास लागले होते... पण सुदैवाने मीटिंग कॅन्सल झाली आणि मी लवकर निघालो... बॅगा भरलेल्या होत्या त्यामुळे ह्यावेळी जास्त घाई झाली नाही... आंघोळी आवरून, जेवून आम्ही 8 च्या आधीच घरून निघालो... नेहमी प्रमाणे 8:30 ची लोकल पकडली... पालघरलाच बसायला मिळाले... मॅडम झोपी गेल्या आणि मी वैभव सुर्यवंशीची बॅटिंग पाहत होतो... दादरला पोहोचल्यावर तिकीट काढून घेतले.. ट्रेन लागली होती पण दरवाजे बंद होते... सुट्टीचा सीजन असल्याने reservation आधीच फूल्ल होते, त्यामुळे पुन्हा जनरल डब्यात प्रवास करावा लागणार होता... जवळपास तासभर लाइन मधे उभे राहिल्यानंतर दरवाजे उघडले गेले... मागच्या वेळी सारखीच समोरासमोरच्या दोन सिंगल सीट पकडल्या आणि गर्दीतला प्रवास सुरू झाला... पहाटे चार वाजता पुण्यात पोहोचल्यावर 2 तास AC वेटिंग रूम मध्ये आराम केला.. तिथेच फ्रेश होऊन 6 वाजता रिक्षा पकडून आम्ही अर्धा तासात दादांच्या घरी पोहोचले...
पुरंदर किल्ला आर्मीच्या अखत्यारीत आहे आणि 10 वाजता प्रवेश दिला जातो.. त्यामुळे घरून निघण्याची घाई नव्हती... मी, श्रुतिका, जितू दादा, वहिनी, रिद्धी आणि शिवत्व.. आमची टीम भटकंती साठी रेडी झाली... साधारण सव्वा आठ वाजता दादांची फोरव्हीलर घेऊन आम्ही निघालो... आधी आम्ही श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानदेव समाधीचे आणि नागेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले आणि किल्ले पुरंदर कडे प्रस्थान केले... घरून निघताना नाश्ता केला नव्हता म्हणून वाटेत एका हॉटेल मधे नाश्ता करण्यासाठी थांबले... 10 वाजायच्या आसपास आम्ही पुरंदराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले... ओळखपत्र क्रमांक, एकूण किती जण आहेत, त्यात पुरुष किती, महिला किती, लहान मुले किती, आपण जे वाहन नेले असेल त्याचा नंबर.. ह्याची सर्व माहिती घेतल्यावर आपल्याला एक receipt दिली जाते... बॅगा चेक केल्यानंतरच आत सोडले जाते... प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सीमेंटच्या चढणीच्या रस्त्याने चालत रहायचे उजवीकडे चर्चची जुनी इमारत नजरेस पडते.. पुढे गेल्यावर आपण वीर मुरारबाजी देशपांडे ह्यांच्या पुतळ्यापाशी पोहोचतो...वीर मुरारबाजी देशपांडे हे मराठा साम्राज्यातील एक अद्वितीय पराक्रमी योद्धा आणि निष्ठावान किल्लेदार होते... पुरंदरच्या ऐतिहासिक लढाईत त्यांनी दाखवलेले शौर्य आजही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा विषय आहे... ते सुरुवातीला जावळीच्या चंद्रराव मोरेंच्या सैन्यात होते... जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली, तेव्हा मुरारबाजींनी मोरेंच्या बाजूने निकराची झुंज दिली होती... मुरारबाजींचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा पाहून महाराज प्रभावित झाले... त्यांनी मुरारबाजींना स्वराज्यात सामील करून घेतले आणि त्यांच्यावर पुरंदर सारख्या महत्त्वाच्या किल्ल्याची जबाबदारी सोपवली... मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान हे प्रचंड फौजेसह स्वराज्यावर चालून आले... त्यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला...तेव्हा झालेल्या लढाईत मुरारबाजींना वीरमरण आले.. मुरारबाजींची तलवार चालवण्याची पद्धत आणि त्यांचे अफाट शौर्य पाहून, समोरून लढून मुरारबाजींना हरवणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर दिलेरखानाने दुरून त्यांच्यावर बाण सोडला जो मुरारबाजींच्या कंठात लागला...मुरारबाजींच्या बलिदानानंतर आणि स्वराज्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महाराजांनी मिर्झाराजेंसोबत तह केला, ज्याला 'पुरंदरचा तह' म्हणतात... या तहामध्ये महाराजांना २३ किल्ले आणि ४ लाख होन मुघलांना द्यावे लागले होते... पुढे १६७० मध्ये महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला... पुतळ्याच्या मागेच त्यांची समाधी आहे... सूर्य डोक्यावर येत होता म्हणुन समाधी आणि पुढे असलेले पुरंदरेश्वर मंदिराचे दर्शन येताना घेऊ असे ठरवून पुढे चालायला सुरुवात केली... पुढे जाऊन डावीकडे किल्ल्याचा दरवाजा लागतो जो तारेच्या कंपाऊंडने बाहेरच्या बाजूने बंद केलेला आहे... थोड पुढे गेल्यावर आणखीन एक चर्चची जुनी इमारत नजरेस पडते... उजवीकडे चौकी आहे, तिथे मोबाईल जमा करावा लागतो आणि तिथून आपला ट्रेक सुरु होतो... गाडीनेच गडाच्या अर्ध्या पर्यन्त पोहोचल्यावर जास्त चढन न्हवतीच... शिवत्व आणि रिद्धी सोबत असताना त्यांच्या सोबत गप्पा आणि मस्ती मुळे उन्हाचा दाह जाणवत नव्हता... अर्ध्या तासाच्या चढाई नंतर एक चेक पॉईंट वर शिवत्व, रिद्धी आणि वहीनी थांबल्या... तिथून उंचावर दिसणार्या केदारेश्वर मंदिर कडे जायचे होते... जितू दादा, मी आणि श्रुतिका आम्ही तिघेच निघालो.. थोडी चढन चढून पायरी मार्ग लागतो... पायर्या चढून आम्ही मंदिराच्या आवारात पोहचलो... सूर्य डोक्यावर आल्याने आमच्या आधी आलेले बरेचजण मंदिराच्या सावलीत विसावले होते...आम्ही महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊन मंदिरातच 2/3 मिनिटे आराम केला... केदारेश्वर मंदिर हे पुरंदर किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर आहे... हे मंदिराचे स्थान किल्ल्यावरील सर्वात उंच ठिकाण असून येथून संपूर्ण परिसराचा विहंगम नजारा दिसतो...येथून वज्रगड, सासवडचा परिसर आणि नीरा नदीचे खोरे स्पष्ट दिसते... मंदिराचे मूळ बांधकाम हेमांडपंती पद्धतीचे आहे... मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड असून, मंदिरासमोर सुबक नंदीची मूर्ती आहे... मुळ मंदिराला आतून रंगकाम केल्यामुळे आणि खाली कार्पेट अंथरल्यामुळे दगडांच्या मंदिरातील थंडावा येथे जाणवत नाही... आजूबाजूचा परिसर न्याहाळून आम्ही उतरायला सुरुवात केली...पुन्हा चेक पॉईंट वर आल्यावर तिथे माकडांची उपस्थिती होती... आम्ही यायच्या आधी त्यांनी फळे, पाण्याची बाटली लंपास केलेली... तिथून पुन्हा खाली उतरून आम्ही जिथे मोबाईल जमा केलेले त्या चेक पॉईंट वर पोहोचले... मोबाईल घेऊन आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे गेले... पुरंदर किल्ल्याचा सर्वात मोठा ऐतिहासिक ठेवा म्हणजे याच किल्ल्यावर युवराज संभाजी महाराजांचा जन्म झाला... छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे हे थोरले पुत्र... एकत्र फोटो घेऊन आम्ही पुन्हा सीमेंटच्या रस्त्याने चालू लागले... परतताना पुरंदरेश्वर मंदिर आणि वीर मुरारबाजी देशपांडे ह्यांच्या समाधीचे दर्शन घ्यायचे होते... सुरुवातील डाव्या बाजूला पुरंदरेश्वर मंदिर लागले, ज्याची प्रतिकृती बालेकिल्ल्यावरील केदारेश्वर मंदिरासारखीच आहे... दर्शन घेऊन आम्ही वीर मुरारबाजी देशपांडे ह्यांच्या समाधीकडे आले... समाधीचे दर्शन घेऊन आम्ही कार कडे परतलो... एव्हाना एक वाजून गेलेले...नाश्ता उशिरा झालेला आणि सोबत नेलेले खाऊ मुळे भूक अशी नव्हतीच, त्यात उन्हामुळे जेवायची इच्छा नव्हती... आम्ही कुठेही न थांबता डायरेक्ट घरी गेले... दादा वहीनींना एकेठिकाणी लग्न अटेंड करायचे होते... घरी आल्यावर वहिनींनी बुरजी पाव चा बेत केला...तत्पूर्वी सर्वानी पोटभर कलिंगड खाऊन घेतले...रात्रभर प्रवासात जागरण आणि दिवसा भर उन्हात ट्रेक झाल्याने डोळ्यात झोप होती...पडल्या पडल्याच झोप लागली... 5:30 वाजता श्रुतिकाने उठवलं... दादा वहिनी वैगरे लग्नाला गेलेले... आम्ही फ्रेश होऊन, चेंज करून, स्कूटी घेऊन जवळपास फिरायला निघाले... दादांनी विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिर सुचवल होत... हे मंदिर मुठा नदीच्या काठावर असल्यामुळे येथील परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे... या मंदिराला 'प्रति पंढरपूर' म्हणूनही ओळखले जाते... या मंदिराचा इतिहास १७३२ च्या पूर्वीपासूनचा आहे... असे मानले जाते की हे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळापासून अस्तित्वात आहे... मंदिराला भक्कम तटबंदी आणि मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे... हे मंदिर वारकरी संप्रदायाचे पुण्यातील एक प्रमुख केंद्र आहे... संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला जाताना या मंदिराच्या परिसरात विसाव्यासाठी थांबते... मुख्य मंदिराच्या आवारात मारुती, गरुड, शनी आणि महादेवाचे मंदिर तसेच दशावतारांच्या मूर्ती देखील आहेत...दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि मुठा नदीतिरी असलेल्या पुंडलिकाच्या मंदिरापाशी आलो... संध्याकाळ, शांत वातावरण, नदी किनारा, मंदिर... मन प्रसन्न करणार वातावरण होत... थोडा वेळ थांबून आम्ही माघारी फिरलो... थोडी शॉपिंग केली आणि घरी पोहचलो... दादा वहिनी वैगरेही जस्ट पोहोचले होते... नंतरचा वेळ छोट्यांसोबत मजामस्तीत गेला... रात्रीच्या जेवणाचा बेत होता खर्डा मटण... जे आम्ही पहिल्यांदाच खाणार होतो.. त्याआधी वहिनींनी त्याची अळणी (सुप सारखा प्रकार) दिली... एकच नंबर... तिथेच श्रुतिकाला सांगून टाकलं - घरी ही रेसीपी ट्राय कर... रात्रीचे जेवण उरकून शतपावली साठी टॅरेसवर गेलो... दुसर्या दिवशी पुन्हा उठून, सर्वांच आवरून जेजुरीला जायचे होते... त्यामुळे झोपण्याची तयारी केली...
सोमवार, दिवस दुसरा - पहाटे पाच वाजता जाग आलेली पण सर्वच झोपलेले होते त्यामुळे पुन्हा झोपलो... पण थोड्या थोड्या वेळाने जाग येतच होती... थोड्या वेळाने मी टॅरेसवर मॉर्निंग वॉक साठी गेलो... येई पर्यन्त सर्वांचे आवरून झालेल... मीही आवरून घेतल... लग्ना नंतर पहिल्यांदाच जेजुरीला जाणार होतो, त्या हिशोबाने आम्ही तयारीतच आलेले... नाश्ता वैगरे उरकून आम्ही साधारण 9:15 वाजता घरुन निघाले...दिड तासाचा प्रवास... शिवत्व आणि रिद्धीची गाणी, मस्ती आणि गप्पा मारत आम्ही खंडोबाच्या नगरीत प्रवेश केला... एके ठिकाणी गाडी पार्क करून, ज्यांच्या कडे गाडी पार्क केली त्यांच्या दुकानातून भंडारा-खोबरं उधळण्यासाठी घेतल... थोड पुढे जाऊन शिवत्व, रिद्धी, मी आणि श्रुतिका ने फोटो वाल्यांकडून फोटो काढून घेतले... आम्ही पहिल्यांदाच जात असल्याने नव्या नवरी सारख श्रुतिकाला उचलून किमान पाच पायर्या चढायचे होते... एप्रिल महिन्याचा शेवट, वेळ दुपारची साधारण 11:30 ते 12... आणि अशा दुपारच्या वेळी श्रुतिकाला उचलून 5/10 नाही तर तब्बल 75 ते 80 पायर्या चढलो (4 attempt मधे 😜) मंदिराकडे पोहोचल्यावर दर्शनाची लाइन बघून किमान दोन ते तीन तास लागतील असा अंदाज बांधुन दर्शन-पास घेऊन दर्शन घेतले... संध्याकाळी 4:35 ची ट्रेन पकडायची होती, त्यामुळे उशीर करून चालणार नव्हतं.. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मंदिराला एक प्रदक्षिणा मारून फोटो विडिओ काढून घेतले... शिवत्वची तर होळी सुरू होती... श्रुतिकाचा पूर्ण चेहरा त्याने पिवळा केला होता... ऊन आणि वेळेचे बंधन असल्यामुळे कडेपठारावर जाता आल नाही... त्यामुळे जेजुरीला पुन्हा जावं लागतंय... येताना प्रसाद, खेळणी खरेदी करून आम्ही तिथून निघालो... वाटेत जेवणासाठी एका हॉटेल मधे थांबलो.. जेवण उरकून पुन्हा वाटेला लागलो... घाटात पोहोचल्यावर बरोबर टर्न वर चढणीच्या ठिकाणी बस बंद पडलेली होती.. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाल.. आता आम्ही टेंशन मधे.. 4:35 ची ट्रेन मिळाली नाही तर रात्री घरी पोहोचता येणार नाही.. विरारला श्रुतिकाच्या बहिणी कडे थांबून सकाळी घरी जाव लागल असत... पुन्हा ऑफिस ला जाण्याची घाई... सुदैवाने आम्ही 4 च्या आधी घरी पोहचलो... पटापट आवरून घेतले आणि दादा वहिनी, आई आणि छोट्यांचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघाले... मेन रोड वर येऊन पुणे स्टेशन साठी रिक्षा पकडली आणि ऑनलाईन ट्रेन तिकीट बूक करून घेतल.. ट्रेनचं स्टेटस चेक केल्यावर ट्रेन वेळेवर असल्याचे समजले.. आम्ही 4:40 वाजता स्टेशनात पोहचलो, ट्रेन आली नव्हती... पुढील दोन तीन मिनिटातच ट्रेन आली.. स्लीपर मधे जाऊन TC ला पैसे देऊन सीट कन्फर्म करून घेऊ अस ठरवून, स्लीपर कोच जिथे येतात त्याठिकाणी उभे राहिले... गाडी थांबत असताना जनरल डब्बे रिकामी दिसले.. पुन्हा पुढे जाऊन जनरल डब्यात गेले.. सीट रिकामी होत्या, अगदी झोपून जाण्यासारख्या... चेन्नई अहमदाबाद एक्सप्रेस (20953) ही ट्रेन फक्त सोमवारीच असते... पुणे येथून सुटल्यावर डायरेक्ट कल्याण आणि 8:20 ला वसई रोड... वसई ला पोहोचे पर्यन्त ट्रेन 40 मिनिटे लेट झाली....9 वाजता आम्ही वसई ला उतरून 9:30 ची डहाणू लोकल पकडून 10:30 वाजता पालघरला उतरलो... पालघरला हॉटेल मधे जेवून घरी पोहोचायला 11:30 वाजले...इथे आमची सुंदर भटकंती संपन्न झाली... आता हे सुवर्णक्षणांचे दोन दिवस आयुष्यभरासाठी आठवणीत घर करून राहतील...
भेटूया लवकरच पुढच्या भटकंती मधे...
तुम्हाला ही भटकंती कशी वाटली... नक्की कळवा?
अक्षय किणी
IG - akshaykini123



























































No comments:
Post a Comment