Saturday, 27 December 2025

किल्ले राजगड भटकंती - २०२५

राजांचा गड, गडांचा राजा.... स्वराज्याची पहिली राजधानी... दुर्गराज राजगड


‎       शिवप्रेमी गडयात्री परिवारासह मार्च २०१६ मधे राजगड भटकंती झाली होती... पण एक दिवसीय भटकंती मधे पूर्ण राजगड पाहून झाला नव्हता आणि आठवणीही धूसर झाल्या होत्या..... आता किल्ले भटकंतीचे व्यसन लागल्या पासून राजगड पुन्हा पहायचे ठरवले... तुषार दादा सोबत बोलण झाल... पण दोघांच्या सुट्यांचा मेळ बसत नव्हता... श्रुतिकालाही भटकंती ची आवड असल्यामुळे तिलाच घेऊन जायच ठरवलं.... मागे दसर्‍याच्या दिवशी आम्ही राजगडावर जाण्याचा प्लॅन केलेला... मी आणि श्रुतिका... दोघेच..... एक दीड महिना अगोदरच ट्रेन ची तिकीटं बूक करून घेतली होती...... राजगडावर नवरात्रीत मुख्यत्वे गडगोंधळी नावाचा कार्यक्रम होतो.... ज्यात राजगडनिवासिनी आई पद्मावती देवीची पूजा केली जाते.... तर नवरात्रीच्या पंचमीला होणार्‍या ह्या कार्यक्रमा दिवशी प्रचंड वारा आणि पाऊस होता त्यामुळे आम्ही दसर्‍याच्या दिवशी जाण्याचा प्लॅन रद्द केला... नंतर कॉमन सुट्टी आलीच नाही आणि मध्यंतरी आम्ही शिवसह्याद्री समुहा सोबत रतनगड भटकंती करुन आले... नंतर ठरवलं कॉमन सुट्टी येण्याची वाट बघण्या पेक्षा पुढच्या महिन्यात सुट्टी काढून जाऊन येऊ.... रतनगड भटकंती करुन आल्यावर दुसर्‍याच दिवशी ट्रेन (11027 - दादर सातारा एक्सप्रेस) चे तिकीट बूक करून घेतले... 14 तारखेला रविवारी रात्रीची 11:55 ची ट्रेन... सोमवारी पहाटे चार वाजता पुणे... बाइक ची व्यवस्था झाल्यास बाइक ने अथवा लोकल ट्रान्सपोर्ट ने जे मिळेल त्याने जायच ठरवलं... राजगड म्हणजे तीन बाजूला पसरलेल्या तीन विस्तीर्ण माच्या, बालेकिल्ला, सुवेळा माची वरचा डुबा आणि डुब्याच्या उजव्या बाजूला काळेश्वरी बुरुज.. एवढ सर्व पहायच असेल तर एका दिवसात शक्यच नाही... खर सांगायच तर नीट व्यवस्थित पहायचं असेल तर दोन दिवस ही कमीच... त्यात राजगड किल्ला पुणे रेल्वे स्टेशन पासुन साठेक किलोमीटर अंतरावर... म्हणुन आम्ही पाहिल्या दिवशी पद्मावती आणि संजीवनी माची बघून रात्री पद्मावती मंदिरात मुक्काम आणि दुसर्‍या दिवशी पहाटे लवकर उठून सुवेळा माची आणि बालेकिल्ला करायच ठरवलं...

        राजगडावर जाण्या आधी आम्ही नालासोपाराच्या कॅपिटल मॉल मधील Decathlon मधून खरेदी करून आलो... श्रुतिका साठी ट्रेकिंग शूज आणि स्लिपींग बॅग... आता नियमित ट्रेक होणार होणार अस गृहीत धरून 😅....

     ‎


निघायच्या एक दिवस अगोदरच रात्री बॅग पॅक केली... दुसर्‍या दिवशी जॉब वरुन आल्यावर निघायचं होतं त्यामुळे वेळ मिळणार नव्हता... संध्याकाळी सात वाजता आम्ही घरी पोहोचले सर्व आवरून, जेवूण आम्ही आठ वाजता घरून निघाले... साडे आठ ची चर्चगेट लोकल.... आमच्या दोघांच्या खांद्यावर बॅग होती आणि एक एक्स्ट्रा प्लास्टिक ची पिशवी ज्यात आमचे शूज होते... पार्किंग मधून निघताना शूज ची पिशवी बाइकलाच राहिली आणि आम्ही प्लॅटफॉर्म नंबर दोन वर फार पुढे पर्यंत चालत गेलेलो... आता लोकल यायला पाच मिनिटे बाकी होती... खांद्यावर असलेल्या मोठ्या बॅग सकट धावत पार्किंग मधे जाऊन पिशवी घेऊन पुन्हा धावत प्लॅटफॉर्म वर आलो... आणि विसापूर ट्रेक ची आठवण आली... जुलै मधे विसापूर ट्रेक ला जाताना असच घडलं... धनसार वरुन निघणार होते... मी घरून निघालो.. शूज ची पिशवी बाइक ला.. सुदेश दादा च्या घरी बाइक लाऊन गाडी येण्याची वाट बघत होते... गाडी आली सोबतच पाऊस घेऊन... आम्ही सर्व धावत जाऊन गाडीत बसलो... पार घोडबंदर-ठाणे येई पर्यंत लक्षातच नाही की शूजची पिशवी बाइकलाच राहिली... झाल कल्याण... तो पूर्ण ट्रेक सॅंडल वर केला... ट्रेक ला सुरुवात केल्यापासून खाली येई पर्यंत continue पाऊस... सॅंडलने खूप साथ दिली असे म्हणे पर्यंत दोन्ही सॅंडलचे मागचे कान निखळले होते.. असो.... तर आमची चर्चगेट लोकल आली... रविवार असूनही खूप गर्दी होती... वसई स्टेशन आल्यावर आम्हाला जागा मिळाली... दादर टर्मिनस प्लॅटफॉर्म नंबर 13... मागच्या महिन्यात ह्याच ट्रेन ने पंढरपूरला गेले होते त्यामुळे प्लॅटफॉर्म माहिती होत.. आम्ही पोहोचायच्या आधी ट्रेन लागली होती... गाडीत जाऊन सीट कन्फर्म करून आम्ही झोपून गेले...चार वाजता पुण्यात उतरुन एक तास वेटिंग रूम मधे आराम केला... तत्पूर्वी पुण्या वरुन राजगड पायथ्याशी जायला बाइक ची व्यवस्था झाली होती... बरेच जणांना विचारून झालेल बाइक साठी.. पण काम होत नव्हत... म्हटलं आता लोकल ट्रान्सपोर्ट शिवाय पर्याय नाही.... लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे पायथ्याशी पोहोचायला दुपारचे 12/1 वाजणार हे निश्चित... भर दुपारी चढावं लागलं असतं... असो... 

जितेंद्र दादा
       तर निघायच्या दोन तीन दिवस अगोदर उंबरगाव प्लॅटफॉर्म वर हितेश भेटला होता... त्याला विचारून बघितल.. त्याने मित्राला फोन केला.. झाली व्यवस्था... आणि आयुष्यात आलेल्या जिवाभावाच्या माणसांत आणखी एक कुटुंबाची भर पडली... जितेंद्र दादा स्वतः Trekker, धारकरी... गडकिल्ल्यांवर भटकंती करणारे एकमेकांना भेटल्यावर Vibe match होणारच.... त्यांनी आदल्या दिवशी लोकेशन पाठवून ठेवलेलं...ओला बुक करुन पहाटे साडे पाच वाजता त्यांच्या घरी पोहचलो.... आपल्या मुळे रात्री अपरात्री एखाद्याला त्रास... त्यात आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो... त्यामुळे ऑकवर्ड फील होत होतं... आम्ही खालूनच चावी घेऊन लगेच निघणार होते.. पण दादा आम्हाला वर घेऊन गेले... दादा वहिनी दोघेही - फ्रेश व्हा, आराम करून उजाडल्यावर निघा, चहा, नाश्ता साठी खूप फोर्स करत होते... आम्ही दोघेही चहा पीत नाहीत... म्हटलं अस सांगुन तरी फोर्स करणार नाहीत... तर वहिनी दोन कप गरम दूध घेऊन आल्या... शेवटी आम्हाला निघायला सहा वाजून गेलेच... इथल्या पेक्षा पुण्यात भरपूर थंडी असल्याने दादाने हॅंड ग्लोव्ज सुद्धा दिले... त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो... मेन रोड वर येऊन मॅप लावला... आणि आमचा राजगडासाठीचा प्रवास सुरू झाला... पुढे जाऊन पेट्रोल टाकी फुल करून घेतली... हॅंड ग्लोव्जची सवय नसल्यामुळे एक्सेलेटर देताना ग्रीप मिळत नव्हतं त्यामुळे हॅंड ग्लोव्ज शिवाय गाडी चालवू लागलो... पण थंडी एवढी होती आता हात फ्रीज होतो की काय अस वाटत होत...  गाडी बाजूला थांबवून हात एकमेकांना घासून घेतले.... पुन्हा हॅंड ग्लोव्ज घालून रेडी... थोड्या वेळाने पुन्हा गाडी थांबवून हॅंड ग्लोव्ज काढले.. असे तीन चार वेळा तरी झाल... एक ठिकाणी रस्त्याच्या कडेला शेकोटी पेटवलेली होती... तिथे थांबून हात शेकून घेतले.. बाजूलाच हॅंड ग्लोव्जच छोट दुकान होत... यांच्या कडून एक साधा हॅंड ग्लोव्ज विकत घेतला... पण साधाच तो.. त्यानेही ग्रीप मिळत नव्हतं.. थोड्या थोड्या वेळाने थांबत आम्ही पुढे जात होतो.... कात्रज च्या आसपास एक बोगदा लागतो... आज पर्यंत बर्‍याच वेळा बोगद्यातून जाणं झाल पण बाइक ने बोगद्यातून जाण्याचा योग प्रथमच..... तीन चार वेळा थांबून आम्ही नसरापूर फाट्यावर पोहचलो... 

राजगड किंवा तोरणा किल्ल्यावर जात असताना ह्या बोर्डाचा फोटो काढणे शास्त्र असते असे बोलले जाते...😜

       इथून उजवी कडे वळून राजगड आणि तोरणा कडे रस्ता जात होता... नसरापूर फाट्यावरून 30 किलोमीटर अंतरावर राजगड आणि 36 किलोमीटर अंतरावर तोरणा किल्ला आहे... हायवे वरुन आता आम्ही गाव खेड्यातून प्रवास करणार होते.... खेड्यातील माणसांची दिवसाची सुरवात पहाटेच होत असते... बहुतेक घरातून निघणारा चुलीचा धूर धुक्यात मिसळत होता.... सोनेरी किरणे.... पक्ष्यांचा किलबिलाट....मधेच शेतकरी बैलजोडी घेऊन शेतात जाताना.... एक रम्य सकाळ आम्ही अनुभवत होतो... अधून मधून नाक्यावर शाळेतली मुले आणि चाकरमानी बस ची वाट बघताना दिसत... 

         रस्त्याच्या डावीकडे अधूनमधून किल्ले राजगड दिसत होता.... पुढे जाऊन आपल्याला मार्गासनी गाव लागतो... त्याच्या डावी कडून गेलेली वाट गुंजवणे गावात जाते... आम्हाला पाली गावातून जायच असल्याने आम्ही पुढे निघालो... पुढे जाऊन डाव्या बाजूला दर्दिगे वाडीतून आपल्याला पाली ह्या गावी जायच आहे.. दर्दिगे वाडीच्या उजवी कडची वाट तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी जाते... जसे आपण राजगडाच्या पायथ्याशी पोहोचायला येतो तसा तीव्र चढ आणि वळणावळणाचा रस्ता लागतो.... हा रस्ता संपल्या वर एक छोटे पठार आहे.. तिथे पार्किंग ची व्यवस्था आहे (हॉटेल राजगड - +919699301560) तिथे पोहोचल्यावर आम्ही फ्रेश होऊन नाश्ता केला... नाश्ता करत असताना पाच सहा मुलामुलींचा एक समूह खाली आला.. ते आदल्या दिवशी गडावर मुक्कामी होते... त्यांच्याकडे गडावर पिण्याच्या पाण्याची आणि रहायची कशी सोय करता येईल ह्याबद्दल चौकशी केली आणि गणपती बाप्पा आणि शिवरायांना स्मरुण गड चढाईला सुरुवात केली.....

वाट अगदी सोपी आहे... साधारण अर्धा पाऊण तासाची चढाई करून पायरी मार्ग सुरू होतो..... शिवप्रेमी गडयात्री परिवारासोबत आलेलो तेव्हा आम्ही गुंजवणे मार्गे चढाई केली होती..... 

      एका शाळेची सहल आली होती... फक्त दहावीत शिकणार्‍या मुली.... गड चढताना त्यांची सोबत होती... त्यांचे आपापसातील संभाषण ऐकून खूप हसायला येत होतं..... श्रुतिका आणि मी शाळेत एकाच वर्गात होतो त्यामुळे आमच्या शाळेत त्यातही प्रामुख्याने वर्गात घडलेल्या आठवणींनी आम्ही भूतकाळात जाऊन आलो....

       ‎मॅप वर राजगड  किल्ला, जाण्याचे मार्ग, अंतर हे सर्व पाहून झालेलं... युट्यूब वर आप्पा परब ह्याचे राजगड स्थळ दर्शनाचे विडिओ पाहिले होते... अजून काही माहिती मिळता येईल का ते पाहिल होतं ... राजगडावर जाण्याच्या तीन चार दिवस अगोदर भूषण दादा कडून आप्पा परब ह्यांचे राजगड स्थळ दर्शनाचे पुस्तक घेतले... ज्यामुळे राजगड पाहताना फिरताना खूप उपयोग झाला....

‎      पुढे गेल्यावर आपल्याला पाली दरवाजा क्रमांक 1 लागतो... ह्याला म्यान दरवाजा सुद्धा म्हणतात... हा दरवाजा दक्षिणाभिमुख आहे... त्याची रचना अशी आहे की म्यान दरवाजा समोर आलेला शत्रू.. पुढून म्यान दरवाजाच्या वरुन, मागून बालेकिल्ल्यावरुन आणि उजवी कडून महाद्वार पायर्‍यांच्या तटबंदीतील जंग्यांमधून केलेल्या तोफ, बंदुका, तिरंदाजी, गोफणगुंडे ह्यांच्या माऱ्यात सापडावा हा उद्देश....


गडावर आदल्या दिवशी ३५९ वा आग्र्याहून सुटका स्मृतीदिन साजरा केला गेला... त्यानिमित्त दरवाजावर फुलांचे तोरण लावले होते... 
     पाली दरवाजा (क्रमांक 1) च्या आत आल्यास बाहेर पाली दरवाजा क्रमांक 2 चा बुरुज आणि बालेकिल्ल्याचा काही भाग नजरेस पडतो....म्यान दरवाजावरील पहारेकरी उर्फ द्वारपाल उर्फ बंकी गडात प्रवेश करूं इच्छिणाऱ्याची पूर्ण प्राथमिक चौकशी करून वरील महाद्वारावरील दौलतबंकी उर्फ महाद्वारपालप्रमुख ह्यास बातमी देत असत.... त्याची परवानगी येईपर्यंत आगंतुकास रोखून ठेवीत.... 
म्यान दरवाजांतून आंत आल्यावर “गोमुखी” बांधणीचा पायऱ्यापायऱ्यांचा पूर्वेकडे चढणीचा मार्ग आहे..... त्या मार्गाच्या डावीकडील तटंबदींत निरनिराळ्या कोनांतून खालील चढणीच्या मार्गावर मारा करूं शकतील अशा लहान मोठ्या जंग्या ठेवल्या आहेत. तो पहिला टप्पा पायऱ्यांचा मार्ग महाद्वार आणि त्याच्या डावीकडील पद्मावती माचीची तटबंदी आणि बालेकिल्ल्याचा पद्मावती माची रक्षक बुरूज आणि तटबंदी ह्यांच्या माऱ्याच्या आहारी आहे.... 

ह्या खुज्या दरवाज्यातून वाकून प्रवेश केल्यानंतर म्यान दरवाजावरील सज्जा लागतो.

दुसरा पायऱ्यांचा टप्पा संपल्यावर डावीकडे थेट महाद्वाराला भिडणारा तिप्पट पायऱ्याचा टप्पा आहे. त्याला दुतर्फा तटबंदी आहे.... उजवीकडील तटबंदीत जंग्या आहेत.... त्या निरनिराळ्या अंशातून आहेत....



        बारामावळांतील मेलेल्या मराठी मनाला गुलामगिरी झुगारून स्वतंत्रता शिकवली त्या शिवरायांच्या सोनेरी पाऊलांनी ह्या महाद्वाराचा उंबरठा पावन झालेला आहे...... स्वधर्मासाठी आत्मबलिदान करणाऱ्या शंभूराजांच्या सोनेरी पाऊलांनी ह्या उंबरठ्यास स्पर्श केलेला आहे..... तत्कालीन उत्तरेतील घोर झंझावती मोंघली वादळ छातीचा कोट करून कसे रोखावे, हे ज्यानी महाराष्ट्राला शिकविले त्या राजारामराजांच्या चिमुकल्या सोनेरी पाऊलांनी हा उंबरठा ओलांडला आहे.... अशा तीनही छत्रपतींचा पदस्पर्श झालेल्या किल्ले राजगडच्या ह्या उंबरठ्याला नमस्कार करुन आम्ही गडप्रवेश केला... 

राणीवसा तलाव 

      पद्मावती माची वर पोहचल्यावर तलावाजवळच एक ताई लिंबू सरबत विकायला बसलेली, पायरी मार्गावरुन येताना थकले असल्याने तिच्या कडून लिंबू सरबत पिऊन वाटेला लागलो... एव्हाना दुपारचे १२ वाजून गेले... थंडीचे दिवस असल्याने उन्हाचा तेवढा दाह जाणवत नव्हता... गडावर मुक्काम करायचा होता त्यामुळे टेंट, रात्री जेवणाच्या सोयीचे सामग्री ह्यामुळे बॅग जड होती.... आम्ही पद्मावती मंदिरात बॅगा ठेवून, ५/१० मिनिटे आराम करून पद्मावती माची पाहायचं ठरवलं...

         ‎तलवाकडे न उतरता पुढे चालत गेल्यावर तटसरनौबत सदर आहे... १६६१ ते १६६५ पर्यंत कडतोजी (प्रतापराव) गुजर हे पद्मावती माचीचे तटसरनौबत होते... ह्या सदरेसमोरील मार्ग हा पद्मावती माची कडून महादरवाजाकडे जातो.. संजीवनी माचीवर जातो... बालेकिल्ल्यावर जातो... सुवेळा माची वर जातो... सदरे खाली तळ घर आहे... महाराजांच्या आणि न्यायाधीशाच्या अनुपस्थितीत एखाद्या अपराध्याला त्यात डांबून ठेवले जात असे... राजवाडा आणि कचेरीचे अवशेष पाहून, फोटो काढून आम्ही पद्मावती मंदिरात बॅगा ठेवायला निघालो...

पद्मावती माची वरुन दिसणारा बालेकिल्ल्याचा उत्तर बुरुज...

मंदिरात देवीचे दर्शन घेऊन आम्ही ५/१० मिनिटे आराम केला...

‎         पद्मावती देवी म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाची धर्मपत्नी... काळाच्या प्रवाहात आर्यावर्तातील ऋषीवरांची शिष्यपरंपरा दक्षिणापथी आली.... त्यातील काहीजणांना सह्यशिखरांवर आत्मिक शांततेचा अनुभव आल्याने तेथेच त्यांनी आपली तपोभूमी निर्माण केली.... आसमंतातील आदिम जमातींना सृजनत्व दिले.... त्यामुळे कृतज्ञतेपोटी स्थानिक लोकांनी त्या सह्यशिखरांना त्या ऋषीवरांची नांवे दिली.... त्यातील काही नावे तशीच लोकांच्या मुखी वसली, तर अपभ्रंशे रुजली. ती अशी, पराशरांचा - पन्हाळा, कौंडिण्य ऋषीचा - कोंढाणा, वशिष्ठांचा - वासोटा तसेच ब्रम्हर्षीचा - बिरमदेवगड (मुरुमदेव म्हणजेच राजगड) होय...(आप्पा परब ह्यांच्या 'किल्ले राजगड स्थळ दर्शन' ह्या पुस्तकातून...)

सद्या मंदिरात प्रवेश केल्यावर गाभाऱ्याबाहेरील डावीकडची उभी मूर्ती हि पद्मावती देवीची शिवरायांनी घडवून घेऊन पूजिलेली मूर्ती आहे....


महादेवाचे मंदिर 

        कचेरीची जागा ओलांडल्यावर कांही पायऱ्या उतरून आपण एका छोट्यास्या टुमदार मंदिरासमोर येतो....पण बॅगा ठेवायच्या होत्या म्हणुन आम्ही सरळ पद्मावती मंदिरात गेले होते.... नंतर महादेवाच्या मंदिरात आले... मंदिर पूर्वाभिमुख आहे... मार्गातील नंदी पाहून आपल्या लक्ष्यांत येते कीं, डावीकडील मंदिर हे "श्रीमहादेव मंदिर" आहे.... किल्ले राजगडावरील वास्तव्यांत शिवराय नित्यनैमित्तिक "श्रीमहादेव" मंदिर गर्भगृहांत येऊन दर्शन घेत असतील हे स्वाभाविक आहे....

सोनोपंत डबीर ह्यांचे निवासस्थान 

मुत्सद्दी सोनोपंत विश्वनाथ डबीर ह्यांचे पादुकायुक्त स्मारक...

       क्रोधनाम संवत्सरे, शके १५८६, माघ वद्य पंचमी, दिनांक २५ जानेवारी १६६५ बुधवार. सोनाजीपंत परलोकास गेले, असें जेधे शकावली सांगते.... सोनोपंतांचा मृत्यु किल्ले राजगडावर झाला. म्हणजे दहनही किल्ले राजगडावर झाले....  त्यांच्या धर्मपत्नीने, मुलानी, नातवानी त्यांच्या अस्थिचा कलश दहन भूमीवरून आणून आपल्या वाड्याशेजारी पश्चिम दिशेस पद्मावती मंदिरासमोर पुरला व त्यावर स्मारक बांधले.... आजकाल ते स्मारक शिवराज्ञी सईबाईसाहेब ह्यांचे म्हणून ओळखले जाते.... आप्पा परबांचा जो स्मारकस्थानांचा अभ्यास आहे, त्यावरून जे ब्राह्मण निधन पावतात. त्यांच्या स्मारकावर “पदकमळे” असतात... कारण ते विष्णुपदाला जातात.... जे ब्राह्मणेतर निधन पावतात, त्यांच्या स्मारकावर "शिवपिंडी” असते.... कारण ते कैलासाला जातात. तसेंच मराठ्यांमध्ये पति पत्निचें स्मारक बांधत नाही.... तर पुत्र मातेचे, पित्याचे स्मारक बांधतो.... मराठ्यांमध्ये निवासाच्या आसमंतांत मृतांचे स्मारक बांधत नाहीत.... मराठ्यांमध्ये नित्यनेमाने मृतांच्या स्मारकाची पूजा अर्चा करीत नाहीत.... ब्राह्मणांमध्ये घराच्या आसमंतांत मृताचे स्मारक त्याच्या अवशेषांवर बांधतात त्यावर पादुका स्थापन करतात आणि त्या स्मारकाला नित्यनियमीतपणें पूजाअर्चा, धूपदिप, नैवेद्य अर्पण करतात. म्हणून आप्पा परब म्हणतात ते स्मारक शिवराज्ञी सईबाईसाहेब ह्यांचे नाही.... तर ते पादुकायुक्त स्मारक मुत्सद्दी सोनोपंत विश्वनाथ डबीर ह्यांचे आहे....




पद्मावती तलाव नजीकच्या तटबंदीतील दरवाजा... 

चोर दरवाज्याकडे जाणारा पायरी मार्ग 


चोर दरवाजा / गुप्त दरवाजा / आपत्कालीन मार्ग

      ‎सोनोपंत डबीर ह्यांचा निवासस्थानासमोरील पायरी मार्ग पद्मावती तलावाच्या उजवीकडे खाली उतरतो....तलावाच्या पुर्वेला आणि पश्चिमेला दरवाजायुक्त तटबंदी आहे... पुढे गेल्यास एक मार्ग चोर दरवाज्याकडे खाली उतरतो.....‎शिवप्रेमी गडयात्री परिवारासह मार्च २०१६ मधे राजगड भटकंती झाली होती तेव्हा गुंजवणे गावातून चढाई करून ह्याच वाटेने गड प्रवेश केला होता...

सुवेळा माची 


तोफांचे अवशेष

तटसरनौबताचे निवासस्थान
     माघारी फिरुन आम्ही सदरेच्या दिशेने चालू लागलो.... त्या मार्गावर डावीकडे पूर्वाभिमुख एक वास्तु पुनर्बाधणी केल्यामुळे उभी आहे.... ते होते तटसरनौबताचे निवासस्थान....कारण त्याच्या खालच्या अंगास तटसरनौबताचे पाण्याचे टाके आहे..... पद्मावती माचीवर शिवाजीमहाराज आणि तटसरनौबत हे दोनच मराठा जातीतील होते.... बाकी सारी वस्ती ब्राह्मण आणि बिनाकुटुंब प्रभू कारकून ह्यांची वस्ती होती.... जातीनिहाय पाणवठा असलेल्या त्या कालखंडावरून ते घर तटसरनौबताचे होते....असे आप्पा परबांनी आपल्या 'किल्ले राजगड स्थळ दर्शन' ह्या पुस्तकात नमूद केले आहे... तसेच त्या इमारतीस दारू कोठार असे चुकीचे नामाभिधान केले आहे....त्याचे विश्लेषण करताना ते म्हणतात... जवळच गडाचे धान्यकोठार, जिजाऊसाहेबांचा वाडा, दिवाण-इ-आम, शासकीय अधिकारी वास्तू, सचिवालय, पद्मावती मंदिर अश्या किल्ले राजगडावरील महत्त्वाच्या वास्तु व महत्त्वाची माणसें असताना तोफा-बंदुका-सुरुंगाच्या स्फोटक दारूचे कोठार किल्ले पद्मावती महामार्गावर असेल काय?

       ‎ठरवल्या प्रमाणे आम्ही पाहिल्या दिवशी पद्मावती माची आणि संजीवनी माची फिरणार होते... दुपारी २ वाजे पर्यंत पद्मावती माची पाहून झाली... संजीवनी माची सुर्यास्ताला पाहायची होती... दुसर्‍या दिवशीचा वेळ वाचावा आणि घाई व्हायला नको म्हणुन सुवेळा माची वरचा डुबा पाहून यायच ठरवलं...

        पद्मावती माचीच्या पूर्वेकडील कड्याकडून एक तटबंदी वर वर चढत बालेकिल्ल्याच्या कड्याच्या पायथ्यापर्यंत गेली आहे.... पद्मावती माची आणि सुवेळा माची ह्यांची ती तटबंदी मर्यादा आहे.... पद्मावती माचीवरून सुवेळा माचीकडे जातानां त्या तटबंदीत एक दरवाजा आहे.... तिथून पायवाट खाली उतरत - चढत पूर्वेकडे सुवेळा माचीवर जाते...

डुब्याजवळ पोहोचल्यावर मागे वळून पाहिल्यास संजीवनी माची, बालेकिल्ला आणि पद्मावती माचीचे मनमोहक दृश्य नजरेस पडते... मजल दरमजल करत, एकमेकाना आधार देत आम्ही डुब्यावर पोहोचले... डुब्यावरुन दिसणाऱ्या तिन्ही माच्या आणि बालेकिल्ला आणि आजूबाजूचा परिसर पाहून नेत्र सुखावले...


राजगड बिरमडोंगरी | तीन माच्या तीन द्वारी ||
दोन तपे कारोभारी | जयावरी राहिले ||

           ‎महाराजांच्या ५० वर्षाच्या हयातीतील जवळपास २५/२६ वर्षे स्वराज्याचा कारभार ह्या राजगडावरुन झाला.... पुढे स्वराज्याचा विस्तार वाढल्यामुळे राजधानी रायगडावर हलविण्यात आली....

‎राजगडावर घडलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना पैकी - स्वराज्याचे तिसरे ​छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला... ​शिवाजी महाराजांच्या पत्नी आणि शंभूराजांच्या मातोश्री राणी सईबाईसाहेब यांचे दुःखद निधन याच गडावर झाले.... १६६४ मध्ये सुरत शहराच्या लुटीतून मिळालेली अमाप संपत्ती याच किल्ल्यावर सुरक्षित ठेवण्यात आली होती.... ​महाराज आग्रा येथून सुखरूप परतल्यानंतर सर्वप्रथम याच किल्ल्यावर आले.... 




डुब्यावरुन उतरुन आम्ही संजीवनी माचीवर जाण्या साठी निघालो...डुबा आणि बालेकिल्ल्याच्या मधल्या वाटेवर झाडा खाली एक आजोबा लिंबू सरबत विकायला बसले होते... लिंबू सरबत पिऊन, त्यांच्याशी गप्पा मारून बालेकिल्ल्याच्या डाव्या बाजूच्या पायवाटेवरून आम्ही चालायला सुरुवात केली... 


नागमोडी आणि चढ-उताराच्या पायवाटेवरून चालताना अधुनमधून संजीवनी माचीचे दर्शन होते... 

मागे वळून पाहिल्यास डुबा आणि काळेश्वरी बुरुज दिसतो... वाटेत बरेच पाण्याच्या टाक्या आहेत... काही तटबंदीला लागूनच आहेत...




        ‎चालता चालता उजवीकडील बालेकिल्ला कडा संपतो आणि डावीकडे संजीवनी माची तटबंदी सुरू होते.... संजीवनी माची तीन टप्प्यांत खाली उतरती आहे... दुसर्‍या टप्प्यात जायला पाहिल्या टप्प्यातील बुरुजाच्या खालून दरवाज्याच्या व्यवस्था केलेली आहे... तसेच तिसर्‍या टप्प्यात जायला दुसर्‍या टप्प्यातील बुरुजाच्या खालील दरवाज्यातून जावे लागते... 









    चिलखती तटबंदी - शिवरायांच्या वास्तुशास्त्रांतील अध्ययनाचा हा परमोच्च अविष्कार... जाणत्या शिवरायांचे दुर्गवास्तुशास्त्रातील मह्त्वाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे तटबंदीवरील पहार्याच्या शिबंदीसाठी तसेच निवासीयांसाठी तटातच प्रातर्विधी स्थाने.... आम्ही माचीच्या तिसर्‍या टप्प्यात आल्यावर तटबंदी वरुन न चालता नाळेतून जायच ठरवलं...
नाळ म्हणजे दोन तटबंदी मधील जागा... दोन तटबंदी मधील अंतर साधारण २ फुट असेल..

नाळेतून जात असताना मधेच उंच सखल भाग येत होते...आणि एका पॉईंटवर उतरायचं होतं. श्रुतिकाला जमणार नव्हतं आणि तिथून जेवढं चालत आले तेवढच माघारी फिराव लागणार होतं.. शेवटी दोन्ही तटबंदीत पाय रोवून आम्ही वर चढले आणि नाळेतून बाहेर पडले...
माघून दिसणारे संजीवनी माचीचे पहिल्या दोन टप्प्यातील बुरुज आणि बालेकिल्ला  

तटबंदीवरील हनुमंताची मूर्ती


तटबंदीवरील शरभ शिल्प

डुब्यावरुन सलग तीन साडेतीन किलोमीटरची पायपीट करुन आम्ही पोहोचले संजीवनी माचीच्या शेवटच्या बुरुजावर... किल्ले राजगडच्या तीन माच्यापैकी ही पश्चिमेकडील माची लांबीने मोठी आहे..... 

किल्ले राजगड डोंगराची ही मावळतीकडील सोंड तीन टप्प्यांनी उतरत गेली असून ह्या माचीची लांबी सुमारे अडीच किलोमीटर आहे.... माची समोरील डोंगररांग उजवीकडे वळत किल्ले तोरण्यास जाऊन भिडते....









‎वेळेच्या नियोजनाप्रमाणे सर्व होत होतं...पहिल्या दिवशीच्या दोन माच्या पाहून झाल्या होत्या... आता दुसर्‍या टप्प्यातील बुरुजावर बसून संजीवनी आणि सूर्यास्त पाहत बसायचं होतं... म्हणुन आम्ही माघारी फिरलो... 


         सूर्यास्त झाल्या नंतर लगेचच काढता पाय घेतला... अंधार पडायच्या आत पद्मावती माची वर पोहचायचे होते... आता बालेकिल्ल्याला उजवी कडे ठेवून मळलेल्या पायवाटेवरून झपाझप पाउले टाकत आम्ही निघालो... सुर्यास्तानंतर पद्मावती माचीवर पोहोचायला अंधार होणार होता म्हणुन सोबत बॅटरी घेतली होती... कुठेही न थांबता आम्ही पद्मावती माचीवर पोहचलो... बालेकिल्ल्याची परिक्रमा पूर्ण झाली... (पद्मावती माचीवरुन डुब्यावर - डुब्यावरुन संजीवनी माचीवर - संजीवनी माचीवरुन पुन्हा पद्मावती माची वर)

मंदिरात आल्यावर पुन्हा देवीचे दर्शन घेतले.... त्यादरम्यान ५/६ मुलांचा एक ग्रुप मंदिरात आला.... दर्शन करून ते सदरेसमोरील जागे कडे टेंट लावण्यासाठी गेले... १०/१५ मिनिटे आराम करून आम्ही जेवणाच्या तयारीला लागले...

पोर्टेबल गॅस-शेगडी सोबत आणली होती... लॉकडाऊन च्या आधी घेतलेली गॅस-शेगडी आता वापरात काढली होती... सोबत सर्व सामान आणलं होतं... सूप चे पॅकेट, गव्हाचे न्यूडल्स, कांदा-टॅमेटो... आधी सूप बनवुन घेतलं नंतर मॅगी बनवली.... मंदिरात आणखीन दोन मुल होती... ते आम्ही यायच्या आधीच मंदिरात आले होते.. त्यांनी संध्याकाळी चढायला सुरुवात केली होती... आमच्याजवळची मॅगी त्यांच्या सोबत शेअर करून.. सर्व सामान आवरून ठेवलं...


आता ९ वाजत आले होते... आजूबाजूला फिरून लाकडं-काठ्या गोळा करून शेकोटी पेटवायची होती.. ५/१० मिनिटे शोधा शोध करून जे थोडं फार मिळालं तेच पेटवून शेकोटी केली... थोड्या वेळाने मंदिरात बसलेली दोन मुल आली... त्यांच्या सोबत गप्पा मारून थोड्या वेळाने आम्ही झोपण्यासाठी गेले... कारण दुसर्‍या दिवशी पहाटे उठून, आवरून भास्करराव पोहोचायच्या आधी आम्हाला सुवेळा माचीवर पोहचायं होत...

दिवस दुसरा - पहाटे ४:३० चा अलार्म लावला होता... पण आणखीन अर्धा तास झोपून ५ वाजता उठून आवरायला सुरुवात केली... हवेत गारठा होता त्यात प्रचंड वारा... वाऱ्यामुळे रात्रभर मंदिराच्या पत्रांचा आवाज येत होता... आमच्याकडचं पाणी जवळपास संपत आलं होतं... मंदिरा शेजारी २ पाण्याच्या टाक्या आहेत.. त्यातील पाणी आणून उकळून घेतल... आणि त्या पाण्याने फ्रेश होऊन सुवेळा माचीवर निघायची तयारी केली... तो पर्यंत ५:३० वाजून गेलेले....
निघायला उशीर झालेला.. म्हणुन आम्ही आमच्या चालण्याच्या वेग वाढवला... आता आमची आणि भास्कररावांची शर्यत लागली होती... सुवेळा माचीवर सर्वात आधी पोहोचायची...थोड पुढे गेल्यावर पुन्हा डुबा समोर आला...आदल्या दिवशी केलेल्या वेळेचा सदुपयोगाचे महत्त्व आज जाणवत होते... डुब्याच्या डावी कडून एक पायवाट खाली खाली जात सुवेळा माचीवर जाते... 

थोडं पुढे गेल्यावर मारुती रायाचे दर्शन झाले...

आणि आम्ही शर्यत जिंकली....


आदल्या दिवशी संजीवनी माचीवर सुर्यास्त आणि आता सुवेळा माचीवर सूर्योदय..... आमचे भाग्य थोर...!

‎सुर्य वर यायच्या आधी आम्ही टेंट लाऊन घेतला.... खरतर टेंट लावण्याची गरज नव्हती... पण खाज.... टेंट मधून फोटो चांगले येतात म्हणे... 😜... पोर्टेबल गॅस-शेगडी आणि टेंट चा उद्घाटन राजगड भटकंतीत करुन टाकलं... आता आम्ही निघाले झुंजार बुरुजाकडे...








जेव्हा तानाजी मालुसरे कोंढाणा घेण्यासाठी गेले होते तेव्हा महाराज ह्याच बुरुजावर होते असे बोलले जाते... कोंढाणा घेतल्यावर गवताची गंजी पेटवून राजगडाला मेसेज दिला गेला होता....  आणखीन पुढे जायला बुरुजाच्या उजवीकडे खालून एक दरवाजा आहे...


झुंजार बुरुज उतरून आम्ही सुवेळा माचीवर जाण्यासाठी चालायला लागलो...ही माची बांधत असताना महाराजांनी स्वतच्या हाताने ह्या माचीच्या एका कोनाडयामधे गणपती बाप्पाची स्थापना केली होती अस म्हंटल जातं... ती ही मुर्ती..... तसा ह्याला ऐतिहासिक पुरावा नाही.. पिढीदरपिढी चालत आलेल्या गोष्टीं पैकी ही पण एक आहे...आप्पा परबांच्या मते ह्या मूर्तीची स्थापना पेशवे कालीन असावी... गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो... 







पुढे आल्यावर आपण राजगडाच्या सुप्रसिद्ध नेढ्याकडे पोहोचतो... आदल्या दिवशी संजीवनी माचीवर पहिली ती 'नाळ' म्हणजे दोन तटबंदी मधील जागा... आणि हे 'नेढं'... म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेलं छिद्र... किल्ले राजगडाला भेट देणार्‍या गडप्रेमींची आकर्षणाची जागा...थोडी कसरत करतच वर चढायचं होतं... बॅग आणि स्टिक खालीच ठेवून आम्ही नेढ्यावर पोहचलो... थोडा वेळ नेढ्यातून आजूबाजूचा परिसर न्याहाळला, फोटो काढून आम्ही खाली उतरले.... 





नेढ्याच्या पुढे गेल्यावर मागे वळून पाहिल्यास नेढ्याचाच दगड आपल्याला हत्ती सारखा दिसतो... त्याला हत्तीप्रस्तर म्हणतात...

झुंजार बुरुज पुर्वे कडून पाहताना हत्तीप्रस्तरावरअंबारी असल्याचा भास होतो...

‎सुवेळा माची पाहून आम्ही माघारी फिरलो... माघारी फिरताना डुब्याच्या डावीकडून काळेश्वरी बुरुजाकडे जायच होतं... श्रुतिका थकली होती त्यामुळे तिने यायच टाळलं...मग मी एकटाच निघालो.. उतरत्या पायवाटेने जात असताना इथेही बरेचसे पाण्याचे टाके दिसतात... एकटाच असल्याने जलद गतीने बुरुजा पर्यन्त पोहचलो.. पण तिथे खूप सारे माकडे होती आणि माझ्याकडे बॅग होती... त्यामुळे मी काढता पाय घेतला... 

तिन्ही माच्या झाल्या... आता बालेकिल्ल्यावर जायचं होतं... पुन्हा पद्मावती माचीच्या सदरेवर आलो... जिथून बालेकिल्ल्याकडे चढती वाट होती... सदरेवरच बॅग ठेवून आम्ही निघालो बालेकिल्ल्याकडे...

‎बालेकिल्ल्याच्या वाटेवर एक ताई लिंबू सरबत विकायला बसलेली... लिंबू सरबत पिऊन आम्ही वाटेला लागलो.. पायवाट संपल्यावर खडी चढन लागते... काही भागाचा अपवाद वगळता बहुतेक सर्वच ठिकाणी रेलींग लावलेली आहे...

ह्या अश्या ठिकाणी रेलींग नव्हती... पावसाळ्यात हा भाग रिस्की असेल...

‎पुढे जाऊन डावीकडे थोडा चढ आहे... तिथे एक छोटी गुहा... ही चौकी पाहाऱ्याची असू शकते...‎इथून दिसणारा बालेकिल्ल्याचा महादरवाजा...

उभ्या सह्यकड्यावर उभे बांधलेले बालेकिल्ल्याचे पंचकोनी बुरूज म्हणजे ह्या देशीचे एक महद् आश्चर्य....
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा काढल्यानंतर त्याचे शिर ह्या महाद्वाराच्या एका कोनाडयात पुरले गेले अशी कथा सभासद बखरीची पाने सांगतात.... आता तो बालेकिल्ल्याच्या दरवाजाचा कोनाडा काळाच्या विस्मृतीत गेला आहे....








तीनही छत्रपतींचा पदस्पर्श झालेल्या किल्ले राजगडावरील बालेकिल्ल्याच्या महाद्वाराचा हा उंबरठा... नमस्कार करुन आम्ही बालेकिल्ल्यात प्रवेश केला...


श्री जननी मंदिर

‎बालेकिल्ल्याच्या महाद्वारातून प्रवेश केल्या केल्याच श्री जननी मंदिर नजरेस पडते... जनन म्हणजे जन्म, उत्पती... जननी म्हणजे आई... शाक्तपंथाशी निगडित अशी ही देवता किल्ले राजगडाच्या बालेकिल्ल्याचे प्राचीनत्व सांगते... शिवकाळात ती महिषासुरमर्दिनी स्वरुपात पुजली गेली... आणि ह्याच देवीला ३२ दाताच्या बोकडाचा मान दिला गेला... अफजलखानाचे मुंडके समोरच्या महाद्वाराच्या कोनाडयात पुरले गेले...

"गडाचे पाणी बहुत जतन करावे"

जननी मंदिराकडून उजवीकडे छोटा पायरी मार्ग वरच्या दिशेला जातो.. तिथे पोहचल्यावर डावीकडे खडकांतील पायरी मार्ग राजप्रासाद संकुलाकडे जातो... आणि उजवी कडे चंद्रकोर तळे नजरेस पडते....पुर्ण गडावर जवळपास ६२ पाण्याचे साठे आहेत (तलाव, टाक्या मिळून).... काही टाक्या सातवाहन कालीन आहेत..‎

ब्रम्हर्षी मंदिर

‎उजवीकडची पायवाट आपल्याला ब्रम्हर्षींच्या मंदिराकडे घेऊन जाते... ब्रम्हर्षी म्हणजे सृष्टी निर्माते ब्रम्हदेव... परंपरागत समजूतीनुसार राजगडाच्या डोंगराचे नाव बिरमदेवाचा डोंगर होते... बिरम (ब्रम्ह)...

‎ब्रम्हदेव कमळांत बसलेले असतात.. कमळ पाण्यावर असते.. म्हणुन कदाचित हे मंदिर अर्धजलाशयावर बांधलेले आहे...

पद्मावती माचीच्या दिशेने उतरत्या पायवाटेने पुढे गेल्यास आपण उत्तरेकडील बुरुजावर येतो... तो नुसता बुरुज नाही तर राजघराण्यातील व्यक्तींचे विश्रांती कक्ष आहे, असे आप्पा परबांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे...शाहीर तुळशीदास ह्यांचा नरवीर तानाजी मालुसरे ह्यांच्यावरील सिंहगडाच्या पोवाड्यानुसार आऊसाहेबांनी किल्ले कोंढाणा ह्याच सज्जातून पाहिला होता.....स्वत:च्या पुत्राचे लग्न बाजूला सारून "आधी लगीन कोंढाण्याचे" ही रणगर्जना किल्ले राजगडाच्या बालेकिल्ल्यातील ह्या उत्तर बुरुजाच्या दालनांत घडली... वातावरण व्यवस्थित असल्यास इथून आपल्याला किल्ले सिंहगड दिसतो... धुक्यामुळे आम्हाला पाहता आला नाही...




चंद्रकोर तळ्याच्या डावीकडील खडकांतला पायरी मार्ग आपल्याला वरच्या दिशेला घेऊन जातो... इथे शिवरायांचे वास्तव्य होते... पुर्वे कडे सदर, दिवाण-इ-खास.. त्याच्या मागे उजवी कडे शिवरायांचे शयनगृह आणि वास्तव्य स्थान....आपण अंतर्मुख होऊन विचार केल्यास, इथली प्रत्येक वास्तु शिवरायांच्या हस्तस्पर्श आणि पदस्पर्शाने पावन झालेली आहे....भूतकाळात कळत नकळत बऱ्याच चुका झाल्यामुळे कधी कधी स्वतःलाच प्रश्न पडतो की ज्या ठिकाणी महाराजांनी वास्तव्य केले ती ही वास्तू पाहणे, स्पर्श करणे हे मी डिझर्व करतो का... आपली तेवढी लायकी आहे का....

आणि द्विधा मनस्थितीत बालेकिल्ल्यावरील वास्तु पाहून जड पावलांनी मी माघारी फिरलो....‎‎

बालेकिल्ला उतरुन सदरेवर येऊन पुन्हा एकदा मागे वळून बालेकिल्ला आणि सुवेळा माची न्याहाळून घेतली... सदरेवर ठेवलेली बॅग घेऊन आम्ही पद्मावती मंदिरात आलो... घरुन निघतात सोबत आणलेली फळं खाऊन...बॅगेतून काढलेले सामान व्यवस्थित सेट करून घेतलं... पुन्हा एकदा पद्मावती देवीचे दर्शन घेतले आणि आम्ही जड पावलांनी गड उतरायला सुरुवात केली...


‎उतरताना ठरवलं की आता कुठेच फोटो साठी न थांबता डायरेक्ट पायथ्याशी पोहचावं... उतरल्यानंतर पुन्हा ३ तासाचा बाइक प्रवास होता... आणि फर्ग्युसन कॉलेज येथे सुरू असलेल्या पुणे बूक फेस्टिवल ला भेट देऊन काही पुस्तके खरेदी करायची होती.... त्यानंतर जी मिळेल त्या ट्रेन ने पहाटे पर्यंत मुंबईला पोहोचून दुसर्‍या दिवशी दोघांनाही ऑफिसला जायचे होते... पण ह्या ठिकाणी फोटोचा मोह आवरता आला नाही...

‎पायथ्याशी पोहचल्यावर ज्यांच्याकडे बाइक पार्क केली होती त्यांच्या दुकानात ५/१० मिनिटे आराम करून आम्ही निघाले... उतरायच्या आधी फळं खाल्ली होती त्यामुळे भूक अशी नव्हती... रस्त्याला लागल्यावर सुरुवातीलाच तीव्र उतारावर भीतभीतच बाइक उतरवली... अधुन मधुन मागे वळून राजगडाचे दर्शन घेतच मार्गक्रमण करीत होतो....

आदल्या दिवशी सकाळ सकाळच आल्यामुळे दुकाने बंद होती.. माणसांची वर्दळ कमी होती.. पण आता परतताना चित्र उलटं होत... येताना श्रुतिकाने ज्या परिसरात भेळपुरी ची पाटी वाचली होती... त्या परिसरात आल्यावर भेळपुरीच्या दुकानाचा शोध घेतला... टेस्ट चांगली असल्यास दुसरी ऑर्डर करता येईल म्हणुन सुरवातीला एकच ओली भेळ ऑर्डर केली... पण एकच भेळ एवढी दिली की दुसरी ऑर्डर करायची गरजच भासली नाही... जवळ जवळ एक जेवणाचे ताट 😅...
नसरापूर फाटा सोडल्यावर हायवे वर बाइकने वेग पकडला... अर्धा पाऊण तासात आम्ही जितू दादाच्या घरी पोहचलो....फ्रेश होऊन झालं... आम्ही जेवून आलो सांगूनही आईने पोहे ठेवलेच... नाहीतर जेवणाचा बेत पक्का होता... दादां सोबतच वहिनी आणि आईही प्रेमळ... अर्धा पाऊण तास गप्पा झाल्या.. आम्हाला बूक फेस्टिवलला जायच होत... तिथे किती वेळ जाणार होता माहिती नव्हत.... निरोप घेऊन आम्ही निघाले... रिक्षा स्टँड पर्यन्त दादाची सोबत होतीच... तर भटकंती मुळेही  आयुष्यात अशी माणसं जुळली जातात....










पुणे बुक फेस्टिवल मधून खरेदी केलेली पुस्तके

पुढे आम्ही फर्ग्युसन कॉलेज येथे सुरू असलेल्या पुणे बूक फेस्टिवलला पोहचलो... आता खांद्यावरच्या ओझ्या सोबत हातातही पुस्तकाचे ओझे वाढू लागले आणि आम्ही खरेदी थांबवली... जवळ पास ३ तास पुस्तक विश्वात भटकंती करुन १८ पुस्तकांची खरेदी केली... बूक फेस्टिवल मधून पाय निघता निघत नव्हता... एका स्टॉल मधे फक्त स्टोरी साठी विडिओ काढण्यासाठी शिरला.. तर तिथे २ पुस्तके नजरेस पडली... लगेच खात्यात जमा केली... आता पुन्हा कुठल्याच स्टॉल मधे शिरायचे नाही अस ठरवून बाहेर पडलो.. तिथे संगीताचा कार्यक्रम सुरू होता.. पुस्तक प्रदर्शनात वेळ कसा जात होता समजत नव्हतं.. म्हणुन पुस्तकप्रेमींसाठी शेजारीच खाऊ कट्ट्याची सोय केली होती... खाऊ कट्ट्यावर खाऊन घेतलं आणि तिथून काढता पाय घेतला...रात्री ११:३० ची कोणार्क एक्स्प्रेस (11020) पकडून पहाटे ४ वाजता दादरला उतरले... तिथून चर्चगेटला जाऊन ५ वाजता सुटणारी डहाणू लोकल पकडली... ७ वाजता पालघर... घरी येऊन फ्रेश होऊन आम्ही दोघही जॉबला जायला रेडी... आणि पुन्हा डेली रुटीन सुरू....