मार्च महिन्यातला तिसरा आठवडा सुरू झाला तशी मनात रुखरुख सुरू झाली, ह्या महिन्यात बहुतेक एकही भटकंती होत नाही... पाहिल्या दोन आठवड्यात होळी, मशाल महोत्सव आणि आळीतील गणेश मंदिराचे जिर्णोद्धाराच्या कामात बिझी असल्याने भटकंतीला जाता आले नाही...शेवटच्या सोमवारी अविनाश भाऊ सोबत सूरतला जायचे आहे... सोमवारी कुठल्याही एका किल्ल्यावर जाऊन येऊ अस ठरवलं... सोबत कोणी असेल तर ठीक नाही तर एकटाच... ह्या महिन्यात आम्ही दमन बाजूच्या ४/५ भुईकोट किल्ल्यावर जाणार होते... बाइक राइड प्लस किल्ले भटकंती ....सागरने (saggy) नियोजन करुन ठेवलेलं, पण तेजसची परीक्षा असल्यामुळे हा प्लॅन एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ासाठी राखून ठेवला... सोमवार जवळ येत होता पण कुठे जायच ठरलं नव्हतं.. दोन दिवस अगोदर GIDC ची नोटीस आली... गुरुवारी २६ तारखेला रामनवमीच्या दिवशी सुट्टी आणि सोमवारी वर्किंग डे... आता गुरुवारी जायच होत.. 3 दिवस extra मिळाले तरी अजूनही कुठे जायच ठरल नव्हत... सागरने घोडबंदर चा किल्ला आणि भिवंडीचे छत्रपती शिवरायांचे मंदिर सुचवलं होतं... पण बाइक चा प्रवास होता त्यामुळे तिथे जायच skip केल... कारण बर्याच जणांन कडून ऐकून होतो की भिवंडीचा रस्ता खूपच खराब आहे... आदल्या दिवशी सागर दादांना (शिवशौर्य ट्रेकर्स) कॉल केला आणि पनवेल नजीकचे जवळपास कोणते किल्ले आहेत जे एका दिवसात जाऊन येऊ शकतात ह्याची चौकशी केली... त्यांनी उरणचा द्रोणागिरी सुचवला सोबत बेलापूरच्या किल्ल्यावरही जाऊन येऊ शकतो अस सांगितल.. सोबत कसे जायचे हेही सांगितल... श्रुतिका पण सुट्टी घेऊन सोबत येणार होती... आम्ही दोघंच जाणार होतो... ठरलं... सकाळी ६ ची डहाणू - पनवेल मेमूने जायच ... पहाटे लवकर उठून सर्व आवरून आम्ही ५:३० वाजता घरुन निघालो... टूरीस्ट तिकीट काढून आम्ही प्लॅटफॉर्मवर पोहोचले.. थोड्या वेळाने ट्रेन आली... ट्रेन साधारण अर्धी रिकामीच होती... ३ तासाचा प्रवास होता त्यामुळे मस्त झोप पूर्ण करू अस विचार केलेला.. पण झोप येईल तर शपथ... पुस्तक बॅगेत होतेच.. मी पुस्तक वाचायला घेतल आणि श्रुतिकाला धुरंधर सिनेमा पाहायचा होता... ३ तास कसे गेले कळलं नाही.. ट्रेन पनवेलला १० मिनिटे उशिरा पोहोचली.. तिथून आणखीन १० मिनिटे चालत बस डेपो पर्यंत पोहोचले... उरणला जाणार्या बसची चौकशी केली आणि जिथे बस लागते तिथे जाऊन लाईन मधे उभे राहिले... ९:४० ला बस आली आणि ५ मिनिटात सुटली... पुन्हा एक तासाचा बसचा प्रवास... साधारण १०:५० पर्यन्त आम्ही उरण बस डेपोत पोहचले...डेपोच्या मागच्या बाजूनेच गडावर जाणारी वाट आहे... १० मिनिटे लोकवस्तीतून गेल्यावर शेवटचा घर सोडल्यावर गडावर चढाई सुरू होते... पहिल्या २/३ मिनिटातच आपल्याला समोर एक मारुतीरायाचे मंदिर येते... मंदिरावर पत्र्याचे शेड केलेले आहे...आणि मंदिराच्या डाव्या बाजूला किल्ल्याचे माहिती फलक लावले आहे... मारुतीरायाचे दर्शन करून आम्ही उजव्या बाजूला जाणार्या पायवाटेने चालायला लागलो... साधी पायवाट आहे.. मधेच थोडीफार चढणीची वाट... ऊन असल्याने दमछाक होत होती... पाऊण तासात आम्ही गडमाथ्यावर होतो... गडाच्या माथ्यावरून करंजा बंदर, ओएनजीसी (ONGC) प्रकल्प आणि समुद्राचे विहंगम दृश्य दिसते... ओएनजीसी प्रकल्पाचे आणि जेएनपीटी बंदराचे फोटो काढण्यास मनाईचे बोर्ड लावल्याने आम्ही डोळ्याच्या कॅमेरातच ते साठवून घेतल... पुढे गेल्यावर आपल्याला दरवाजा असलेली भिंत दिसते.. त्यातून आत प्रवेश केल्यावर डाव्याबाजूला एक तोफ तोफगाड्यावर विराजमान केलेली दिसते... तोफेच्या उजव्या बाजूला पोर्तुगीजकालीन चर्चचे बांधकाम, पाण्याचे हौद, झेंडा असलेला बुरुज, बालेकिल्ल्याची तटबंदी आणि एक लहान प्रवेशद्वार आणि वेताळ मंदिर आहे...
हा किल्ला सुरुवातीला देवगिरीच्या यादवांच्या अधिपत्याखाली होता... त्यानंतर १५३० च्या सुमारास पोर्तुगीजांनी याची डागडुजी केली... १६ व्या शतकात काही काळ हा आदिलशहाकडे होता आणि नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला... १७३९ साली मानाजी आंग्रे यांनी हा किल्ला ब्रिटिशांकडून जिंकून मराठा साम्राज्यात सामील केला... छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही या किल्ल्याचा संदर्भ येतो... मुंबई आणि उरण बंदराच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा मानला जात असे... गड पाहून झाल्यावर आम्ही सोबत आणलेला फळांचा डब्बा खाऊन घेतला आणि गड उतार व्हायला सुरुवात केली... १ वाजता आम्ही पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीत पोहचले... तिथल्या एका दुकानातून ताक घेऊन शरीराला आतून थंड केले... आता आम्हाला बेलापूर किल्ल्यावर जायचे होते... उतरताना चौकशी साठी सागर दादांना कॉल केलेला.. त्यांनी बस किंवा वडापचा पर्याय सुचवला... बस डेपो मधे चौकशी केल्यावर समजले १ वाजता दादरसाठी सुटणारी बस अजून आलेली नव्हती.. आणखीन एकाकडे चौकशी केल्यावर समजले की NMMT च्या बसेसही दादरसाठी जातात, म्हणुन आम्ही डेपो च्या बाहेर निघून पुढच्या बस स्टॉप पर्यन्त चालत गेले... आम्हाला नवीमुंबई महापालिका ऑफिस कडे उतरायचे होते.. इथून २३ किलोमीटर अंतर होत... म्हणजे जवळपास पाउणतासाचा प्रवास... २ वाजता आम्ही नवीमुंबई महापालिका ऑफिस कडे पोहोचले आणि समोरच असलेल्या गोवर्धनी माता मंदिर प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला.. सागरी पोलीस ठाण्याच्या पुढे गेल्यावर उजवी कडे वळून आपल्याला डांबरी रस्त्याने चालत रहायचे आहे... चढन नसल्याने पुढील १०/१५ मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचतो... प्रवेशद्वाराकडील बुरुजाच्या आतील बाजूस एका चौथर्यावर महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे... किल्ल्याला पूर्वी पाच बुरुज होते... आजही काही बुरुजांचे अवशेष आणि पडलेली तटबंदी पाहायला मिळते... काही ठिकाणी तटावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत, तिथून आजूबाजूचा परिसर न्याहाळता येतो... नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे असलेला बेलापूर किल्ला हा इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पण सध्या काहीसा दुर्लक्षित असलेला किल्ला आहे... या किल्ल्याचे बांधकाम साधारणपणे १५६० ते १५७० च्या दरम्यान पोर्तुगीजांनी केल्याचे मानले जाते... १७३३ साली चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला... मराठ्यांनी या विजयानंतर किल्ल्याचे नाव 'अमृतदुर्ग' असे ठेवले होते... १८१७ मध्ये हा किल्ला पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेला... त्यांनी या किल्ल्याच्या तटबंदीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जेणेकरून मराठ्यांना त्याचा पुन्हा वापर करता येऊ नये...किल्ला पाहून झाल्यावर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला... बस स्टॉपवर येऊन आम्ही पुन्हा दादरसाठी जाणार्या बसची वाट पाहत होते... जवळपास अर्धा तास वाट पाहूनही बस आली नव्हती... M-indicator वर ट्रेनचे timetable चेक केले... बेलापूर वरुन CSMT साठी जाणार्या लोकल होत्या... रिक्षाने बेलापूर स्टेशनला जाऊन वडाळा लोकल पकडली... त्या लोकलने कुर्ला येथे उतरून पुन्हा दादर साठी दुसरी लोकल पकडली... ४:१० पर्यन्त दादर ला पोहोचल्यावर नचिकेतला कॉल करुन पालघरला थांबणार्या जयपूर एक्सप्रेस आणि भूज एक्सप्रेसचा बोरिवलीचा टाइम विचारून घेतला...जयपूर एक्सप्रेसला अंधेरी वरुन बसायला मिळेल असे त्याने सांगितले आणि तो स्वतः त्याच ट्रेन साठी अंधेरीला येत होता... भरपूर वेळ होता म्हणुन दादरला काहीतरी खाऊ अस ठरवलं होतं... पण गरमी मुळे खायची इच्छा नव्हती, त्यामुळे मी फ्रूट ज्युस आणि श्रुतिकाने ice-cream घेतल... दादर वरुन लोकल पकडून आम्ही अंधेरीला उतरले, मागोमाग नचिकेतही आला आणि ट्रेनही आली... ७ वाजेपर्यंत आम्ही पालघरला पोहोचले... दिवसभरात एक मेमू, दोन बस, एक रिक्षा, तीन लोकल आणि एक एक्सप्रेसचा प्रवास झाला... आणि पुन्हा एवढं फिरुन आमच्या मॅडमला रात्री जत्रेला जायचच होत...
भेटूया लवकरच पुढच्या भटकंती मधे...
तुम्हाला ही भटकंती कशी वाटली... नक्की कळवा?
अक्षय किणी
IG - akshaykini123
















































No comments:
Post a Comment