Friday, 27 February 2026

किल्ले सिंहगड भटकंती - २३.०२.२०२६

‎सिंहगड भटकंती  

 ‎4 तारखेला श्रुतिकाच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आम्ही कुठल्या तरी गडावर भटकंतीला जाऊ असा बेत केला होता... मागच्या डिसेंबर मधे राजगडावर गेलो होतो, तेव्हा जितू दादा बोलले होते की पुन्हा येतील तेव्हा कळवा, आपण सिंहगडावर जाऊ... ते डोक्यात होत.. मग सिंहगड फायनल ठरवलं... 4 तारखेला बुधवार होता आणि आता प्रश्न होता रजेचा... माझ्या सुट्टीचा वार सोमवार आणि श्रुतिकाचा शुक्रवार... कंपनीकडून मिळणारे वर्ष 2025-26 चे सर्व सुट्ट्या संपल्यामुळे मला रजा घ्यायला जमणार नव्हती... मग 2 तारखेला सोमवारी जायच ठरवलं... जितू दादाला आगावू कल्पना देऊन ठेवली... पण आईची तब्येत बरी नसल्याने आम्ही जायचा बेत रद्द केला... त्याच आठवड्यात 7 तारखेला, मी शिवशौर्य ट्रेकर्स सोबत भैरवगडला जाणार होतो म्हणून 9 तारखेचा सोमवार skip करून पुन्हा सिंहगडासाठी 16 तारीखचा सोमवार फायनल केला... जायच्या 4 दिवस आधी नोटीस आली - महाशिवरात्री निमित्त रविवारी सुट्टी असणार होती, आणि सोमवारी ऑफिसला जायचे होते... दादाला मेसेज करून कल्पना दिली...आता शनिवारी रात्री निघायचे होते...

    ‎संध्याकाळी ऑफिस मधून लवकर निघाला, बॅग भरायची होती आणि दादा कडे मच्छी घेऊन जायची होती ती एका थर्माकोलच्या छोट्या पेटीत, बर्फात व्यवस्थित पॅक करायची होती, जेणे करून ट्रेन प्रवासात बर्फाचे पाणी पडणार नाही... घरी आल्यावर आधी बॅग भरून घेतली आणि बाकीच आवरून घेतल... लवकर निघायचे होते म्हणुन आईला लवकर जेवण बनवायला सांगून ठेवल होत... जेवून झाल्यावर निघताना मच्छी पॅक करून घेतली... 8:28 ची चर्चगेट लोकल पकडण्यासाठी आम्ही 8 वाजता घरुन निघालो... घरून निघतानाच ऑनलाईन तिकीट काढून घेतले होते... ट्रेन मधे गर्दी होती, त्यामुळे उभ्यानेच प्रवास सुरू झाला...आम्ही निघाले आहेत हे जितू दादांना मेसेज करून कळवलं... दुसर्‍या दिवशी दुपार नंतर पुण्यावरून दादर, वसईसाठी कोणकोणत्या ट्रेन आहेत हे सर्च करत असताना अचानक आठवल की आम्ही ज्या ट्रेन चा विचार करून निघालो होतो ती ट्रेन शनिवारी नसते... सोमवार सुट्टीच्या हिशोबाने आम्ही नेहमी रविवारी रात्रीची ट्रेन पकडतो, पण महाशिवरात्रीच्या सुटीच्या adjustment मुळे आम्ही एक दिवस आधीच निघालेले, त्यात नेहमीचीच ट्रेन डोक्यात होती... आम्ही तोपर्यंत विरार सोडले होते... वसईला उतरून पुन्हा माघारी फिरायच ठरवलं, कारण पुणे साठी आणखीन दोन ट्रेन होत्या त्या CSMT वरून सुटणारे होते आणि त्यांची वेळ लवकर होती... Reservation नसल्याने जनरल डब्यात जायचे होते... त्यात दादरला चढताना गर्दी, बसायला जागा तर मिळणार न्हवती.. चार्ट वेकन्सी वर चेक करून बघितल तर सर्व स्लीपर डब्यातले सीट बूक होते... आम्ही माघारी फिरतो आणि पुढच्या सोमवारच्या नियोजनाचे गुरुवार पर्यन्त सांगतो हे दादांना कळवलं... त्या सुट्टीच्या दिवशी मी अण्णांसोबत मासे पकडण्यासाठी गेलो...गुरुवारी श्रुतिका सोबत बोलून सोमवारी जायच कन्फर्म केल... जितू दादांना मेसेज करून कळवलं... पुन्हा सेम प्रकार... रविवारी ऑफिस मधून लवकर, बॅग पॅक, जेवण, त्यानंतर मासे पॅक करून घेतले... 8 वाजता घरुन निघाले... ट्रेन मधे गर्दी कमी असल्यामुळे पालघरवरुनच बसायला जागा मिळाली... दादरला 10 वाजता उतरले... घरुन निघताना घाई झालेली म्हणुन थोडच जेवून निघालेले, त्यामुळे भूकही लागली होती... 11:55 ची ट्रेन होती त्यामुळे आमच्या कडे 2 तास वेळ होता... थोड खाऊन घेतल आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर गेलो... ट्रेन आधीच लागली होती... 

Reservation केल नव्हत त्यामुळे जनरल तिकीट काढल होत... जर बसायला मिळाले नाही तर स्लीपर डब्यात जाऊन TC ला 100/200 रुपये देऊन सीट मिळवायची होती... ट्रेन आधीच लागली असली तरी ट्रेनचे दरवाजे आतून बंद होते... अर्धा एक तास आधीच ते उघडले जातात... आम्ही गेल्यानंतर काही वेळाने दरवाजे उघडले, त्यामुळे आम्हाला बसायला जागा मिळाली... समोरासमोर सिंगल सीट... आणि गर्दीतला प्रवास सुरू झाला... ठाणे आणि कल्याण आल्यावर खूप गर्दी झाली... गावात ग्लोबल कोकण महोत्सव होता त्यामुळे मागील 4/5 दिवसापासून सतत जागरण सुरू होती...रोज रात्री उशीरा झोपून पुन्हा ऑफिसला जाण्यासाठी पहाटे पाच वाजता उठायला लागत होत... तरी झोप लागत नव्हती.. पुणे येई पर्यंत जागाच... श्रुतिकाची झोप झाली... 4 वाजता पुण्यात उतरले... दोन्ही वेटींग रूम फुल पॅक होत्या... जागा मिळेल तिथे लोक झोपली होती... पूर्ण प्लॅटफॉर्मला चक्कर मारली तेव्हा AC Waiting room, 10 रुपये प्रति तास असा बोर्ड वाचला... 2 तास मस्त झोपू असा विचार केला... पण तिथेही झोप लागली नाही... श्रुतिकाने मात्र तिची झोप पूर्ण केली... मी तिथेच फ्रेश होऊन घेतले... 6:15 वाजता आम्ही तिथून निघाले... Ola कार बूक करून अर्धा तासात आम्ही जितू दादाच्या घरी पोहोचले... 

खडकवासला धरण

आदल्या दिवशी ते गावी जाऊन आलेले आणि कामामुळे दादांना यायला जमणार नव्हत... थोडावेळ गप्पा झाल्यावर, आवरून घेतल... बॅग तिथेच ठेवली आणि दादांकडची छोटी बॅग घेतली ज्यात फक्त पाण्याची बॉटल आणि wallet घेऊन आम्ही दादांची KTM घेऊन साधारण 7:45 वाजता निघालो... KTM चालवण्याचा योग पहिल्यांदाच... त्यांच्या घरा कडून सिंहगड किल्ला 21 किलोमीटर अंतरावर आहे... पुढे जाऊन पेट्रोल भरून घेतल... मॅप लाऊन आमचा पुढील प्रवास सुरू झाला... शहरी भाग सोडल्यावर थोड्या वेळाने खडकवासला धरण लागते...धरणाला लागूनच रस्ता आपल्याला पुढे घेऊन जातो...थोडा वेळ तिथे थांबून, फोटो काढून आम्ही निघाले...

आणखीन पुढे गेल्यावर किल्ले सिंहगड आपल्या नजरेस पडतो... दुरवर दिसणार्‍या सिंहगडला बघत बघतच आपला प्रवास सुरू राहतो... गिरीनगर सोडल्यावर पुढे जाऊन दोन रस्ते लागतात, त्यातला उजवी कडे जाणार रस्ता गोऱ्हे खुर्द येथे जातो... समोरचा रस्ता आपल्याला सिंहगडाकडे घेऊन जाणारा आहे... पुढे जाऊन पुन्हा दोन रस्ते सुरू होतात एक सिंहगडाच्या पायथ्याशी जाणारा, दुसरा डायरेक्ट सिंहगडावर घेऊन जाणार... वेळ वाचविण्यासाठी आणि संध्याकाळची ट्रेन मिळाल्यास रात्री 10/11 पर्यंत घरी पोहोचू ह्या हिशोबाने आम्ही दुसरा रस्ता निवडला... 










रस्ता घाटाचा त्यात मधेच प्रचंड चढण... दुतर्फा काही वाळलेली, काही पानांनी बहरलेली झाडी आणि जणू काल परवाच बनवलेला डांबरी रस्ता... वाह काय नजारा होता... असच जात असताना रस्त्याच्या कडेला, फक्त 5/6 फुटावर चक्क मोर दिसला... बाइक स्लो करून पुढे जाऊन थांबलो... श्रुतिका उतरून मोर बघायला मागे गेली.. पण ती पोहोचे पर्यन्त मागून येणार्‍या कारच्या हॉर्नने ते रानात पळून गेले... आम्ही आमचा प्रवास सुरू ठेवला... निसर्गरम्य ठिकाणी थांबत, फोटो घेत बरोबर 9 वाजता आम्ही वर पार्किंग पर्यन्त पोहोचले... 






आम्ही पोहोचायच्या आधी पार्किंगमधे दहा ते पंधरा कार आणि वीसेक बाइक होत्या... सोमवारच्या दिवशीही इतकी गर्दी... शनिवार, रविवारी किती असेल...जिथे बाइक पार्क केली त्याच्या समोरची म्हणजे दक्षिणेकडची डोंगररांग, त्याच्या पायथ्याशी वसलेली खेडी म्हणजे निसर्गाच्या कॅनव्हासवर केलेल तैलचित्रच जणू... 


डोंगररांगेच्या मागेच किल्ले राजगड दिमाखात उभा होता... बालेकिल्ला, सुवेळा माची, पद्मावती माची आणि थोड्या प्रमाणात संजीवनी माचीही दिसत होती... राजगडाच्या उजव्या हाताला असलेला किल्ले तोरणा प्रश्नार्थक नजरेने बघत होता.. जणू म्हणत असेल राजगडावर जाऊन आला, आता सिंहगडावर आहे.. माझ्या कडे कधी येतोय?... मनातल्या मनात लवकरच किल्ले तोरणा भटकंतीला येतो असे आश्वासन देऊन, बाइक पार्क करून उजव्या बाजूला जाणार्‍या पायवाटेने चालायला लागलो... 




पुणे दरवाजा - क्रमांक १ 









पुणे दरवाजा - क्रमांक २ 




थोडं चालल्यानंतर लगेचच पहिला दरवाजा लागतो - पुणे दरवाजा क्रमांक एक (ह्याला डोणजे दरवाजा देखील म्हणतात)... मात्र हा एकच दरवाजा नसून असे एका मागोमाग तीन दरवाजे आहेत.... पाहिल्या दरवाजाच्यावर बाहेरील बाजूस शरभ शिल्प कोरलेले दोन दगड बसवलेले आहेत... दरवाजातून आत आल्यावर सज्जावर जाण्यासाठी उजवी कडे पायरी मार्ग आहे... ह्या पहिल्या दरवाजातून आत आले की, थोड्या उंचावर दुसरा दरवाजा आहे...तो पुणे दरवाजा क्रमांक दोन... दुसर्‍या दरवाजाचा पायरी मार्ग जिथे सुरू होतो तिथे महाराष्ट्र शासनाने किल्ले सिंहगडाचा स्थानदर्शक नकाशा दाखवला आहे...किल्ले सिंहगडाच्या परीसरात जवळपास आणि दुरवर नुसत्या डोळ्यांनी दिसणार्‍या किल्ल्यांची नावे दिशा दर्शक बाणांनी दाखवली आहे... दुसर्‍या दरवाजा संबंधी विशेष माहिती नाही... पहिल्या दोन्ही दरवाजाची रचना जवळपास सारखीच आहे... 


पुणे दरवाजा - क्रमांक ३ 





पुण्याच्या बाजूचा सर्वात वरचा म्हणजे तिसरा दरवाजा, हा फारच महत्त्वाचा आहे... या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खांबावरील शिल्पांवरून व गणेशपट्टी वरील कमळांवरून, गडाचा थेट संबंध १३ व्या शतकातील यादव काळाशी येतो.... देवगिरीच्या यादवांच्या काळात किल्ले सिंहगडापासून उत्तरेकडील सर्व प्रदेशांवर यादवांचे साम्राज्य होते आणि गडावरून यादव मोठ्या प्रदेशावर लक्ष ठेवून होते.... किल्ला जरी यादवांनी बांधलेला नसला, तरी हा दरवाजा मात्र यादवांच्या काळातच बांधला गेला असावा, असा अनुमान येथील रचनेवरुन काढता येतो... ह्या दरवाजाच्या दोन्ही बुरुजाच्या बाहेरील बाजूस शरभ शिल्प कोरलेले आहे... 


तिसऱ्या दरवाज्यातून पुढे गेले की, लागते एक खोदकाम... हे खोदकाम पुणे दरवाज्यापेक्षाही प्राचीन आहे.... वास्तविक हे पाण्याचे टाके असावे, याच्या मधोमध खांब आहेत आणि बाहेरचे पाणी आत येऊन मिसळू नये, यासाठी बाजूने कठडे खोदलेले आहेत... ही जागा घोड्याची पागा म्हणून ओळखली जाते... खडकाच्या खिंडारातून आत गेल्यावर पुढे मोकळे अंगण आणि त्यामागे खडक खोदून निर्माण केलेली चौकोनी कुंडासारखी जागा आहे... तिथे पाणी आहे.... या खोदकामाची उंची घोडा उभा राहु शकेल एवढी सुद्धा नाही... त्यामुळे ही घोड्यांची पागा नसेल... 



पुढे गेल्यावर वाटेत बरेच छोटी छोटी दुकान मांडून स्थानिक लोक सीजनल फळे, कांदा भजी, दही - ताक, पिठलं भाकरी विकताना दिसली... गडावर सर्व ठिकाणी फिरण्यासाठी जवळपास 4 फुट रुंदीची दगडी पायवाट बांधलेली आहे... त्याच वाटेने पुढे गेल्यावर एक वाट उजवी कडे वळते... तिथे लोकमान्य टिळकांचे निवासस्थान आणि छत्रपती राजाराम महाराजांची समाधी चा फलक लावलेला आहे... त्या वाटेने जाताना एक छोटीखानी विहीर नजरेस पडते... विहीर छोटी असली तरी तिच्या रचनेने ती आपल्याला तिच्याकडे आकर्षित करते... 

लोकमान्य टिळकांचे निवासस्थान 


थोड पुढे जाऊन डावीकडे गेल्यास लोकमान्य टिळकांच्या निवासस्थानासमोर आपण येतो... लोकमान्य टिळकांना दम्याचा त्रास होता... सिंहगडावरील शुद्ध हवामानामुळे त्यांना आराम वाटत असे, म्हणून ते अनेकदा विश्रांतीसाठी आणि लेखनासाठी येथे येऊन राहत असत... टिळकांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे लेख आणि 'गीतारहस्य' या ग्रंथातील काही अंशांचे विचारमंथन याच ठिकाणी केल्याचे मानले जाते.... 

छत्रपती राजाराम महाराज समाधी 


त्यांच्या निवासस्थानाला लागूनच गेलेल्या वाटेने पुढे चालत गेल्यावर उजवीकडे उतरती पायवाट आपल्याला छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीकडे घेऊन जाते... छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू सन १७०० मधे सिंहगडावर झाला... वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी देह ठेवला.... हे ठिकाण गडाच्या एका शांत भागावर स्थित आहे... ही समाधी एका भव्य चौथऱ्यावर बांधलेली आहे... समाधीवर एक सुंदर घुमट (छत्री) असून त्यावर कोरीव काम पाहायला मिळते.... समाधीच्या गाभाऱ्यात छत्रपती राजाराम महाराजांच्या पादुका आहेत... समाधी जिर्णोद्धाराचे काम सुरू असल्यामुळे आम्हाला आत प्रवेश करता आला नाही... बाहेरूनच वंदन करून आम्ही पुढील वाटचाल सुरू ठेवली... 








तटबंदी च्या कडे कडेला केलेल्या वाटेने आजूबाजूचा परिसर न्याहळत पुढे चालत रहायचे... नंतर आपण सनसेट पॉईंट जवळ येऊन थांबतो... येथून खालील दरीचे आणि सभोवतालच्या डोंगररांगांचे अतिशय सुंदर दृश्य दिसते.... पावसाळ्यात हे संपूर्ण ठिकाण पाहायला आणखीनच भारी वाटेल... तिथे फोटो वैगरे घेऊन आम्ही डावी कडे तानाजी कड्याकडे चालू लागलो... 

तानाजी कडा 

सिंहगडावरील तानाजी कडा हा केवळ एक भौगोलिक भाग नसून मराठा साम्राज्याच्या इतिहासातील पराक्रमाचे जिवंत प्रतीक आहे... छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सुभेदार तानाजी मालुसरे यांनी ज्या कड्यावरून चढाई करून कोंढाणा (आजचा सिंहगड) जिंकला, तोच हा प्रसिद्ध तानाजी कडा.... ज्या कड्याने इतिहास घडताना पाहिला, त्या तानाजी कड्यावर उभे राहून आजही अंगावर शहारे येतात.... इ.स. १६७० मध्ये झालेल्या 'कोंढाण्याच्या लढाईत' तानाजी मालुसरे यांनी आपल्या निवडक मावळ्यांसह रात्रीच्या वेळी या अत्यंत अवघड आणि उभ्या कड्यावरून गडावर चढाई केली होती.... शत्रूला कल्पनाही नव्हती की कोणी या बाजूने येऊ शकेल, इतका हा कडा दुर्गम आहे... याच लढाईत सुभेदार तानाजींना वीरमरण आले आणि महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे अजरामर वाक्य उच्चारले...   




  तटबंदीला लागून असलेल्या पायवाटेने पुढे आल्यास पुन्हा दोन पायवाट लागतात... उजवीकडील पायवाट झुंजार बुरुज आणि कल्याण दरवाज्याकडे जाते.. आणि डावीकडील वाट सुभेदार तानाजी मालुसरे ह्यांच्या समाधीकडे तसेच अमृतेश्वर भैरव मंदिर आणि कोंढाणेश्वर मंदिराकडे जाते... आम्ही आधी समाधी कडे जाण्याचा निर्णय घेतला... समाधी कडे पोहोचल्यावर तिथे मुला मुलींची गर्दी दिसली... एका कॉलेज मधील एका वर्गाची सहल आली होती... ते सर्व निघण्याच्या तयारीत होते त्यामुळे आम्ही बाहेरच थांबलो... सर्व मुल मुली बाहेर पडल्यावरच आम्ही आता गेलो... आत गेल्यावर समाधी समोरील प्रांगणात विविध शस्त्रधारी मावळ्यांचे लढाईच्या पवित्र्यात पुतळे उभे केलेले आहेत... त्याच्या बाजूच्या भिंतीवर किल्ले सिंहगडावर झालेल्या लढाई संदर्भातील काही प्रसंग 3D स्वरुपात दाखवले आहे... 




आता येतो आपण मुख्य समाधीच्या समोर... ज्यावर मेघडंबरीचे काम केलेले आहे... शिवकाळातच इथे चौथरा बांधला आणि तानाजींच्या स्मृतीप्रित्यर्थ वीरगळ ठेवली आहे.... कडा पाहिल्यानंतर या स्मारकाला भेट देऊन अभिवादन करणे प्रत्येक दुर्गप्रेमी आपले कर्तव्य समजतो... आम्ही दोघही तिथे नतमस्तक झालो... 







समाधीच्या उजवीकडे एका चौथर्‍यावर सुभेदार तानाजी मालुसरे ह्यांचा ब्रांझचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे... दरवर्षी माघ वद्य नवमीस म्हणजे ज्या दिवशी हा संग्राम झाला, त्याच तिथीस तेथे तानाजी मालुसरेंचा स्मृतीदिन साजरा केला जातो.... केरळ येथून आलेले साधारण पन्नाशीच्या वयोगटातील एक couple तिथे होत... त्यांच्या मोबाईल मधे त्यांचे फोटो काढून दिले आणि आम्हीही त्यांच्या कडून आमचे फोटो काढून घेतले...थोडा वेळ तिथे थांबून आम्ही बाहेर पडले... 





आता सूर्य बराच वर आलेला त्यामुळे उन्हाचा हलका दाह जाणवत होता... बाहेर पडल्यावर बाजूलाच एक काकू ताक आणि फळे विकत होत्या... त्यांच्या कडून ताक पिऊन आम्ही अमृतेश्वर भैरव मंदिराकडे आलो...मंदिराच्या बाहेर तीन तोफा तोफगाड्यासह विराजमान आहेत... 




सदरचे मंदिर हे दक्षिणाभिमुख असून यांत भैरव आणि त्यांची शक्ति भैरवी अशा दोन उभ्या मूर्त्या आहेत... यांपैकी भैरवाच्या चार हातात अनुक्रमे जंबिया, डमरू, त्रिशूल व मुंड या वस्तू असून जवळच मुंडातून गळणारे रक्त पिण्यासाठी कुत्रा तोंड वर करून दोन पायांवर उभा आहे... आणि भैरवीच्या चार हातात भाला, डमरू, त्रिशूल व परळ या वस्तू आहेत... सध्याचे मंदिर छोटे असले तरी येथे पूर्वी मोठे मंदिर असावे असे येथील अवशेषांवरुन वाटते... 

समर्थ स्थापित हनुमंतराय 


अमृतेश्वर मंदिराच्या शेजारी असलेले हत्ती तलाव पाहून आम्ही कल्याण दरवाजाकडे निघाले... वाटेतच एक छोटे हनुमंताचे मंदिर नजरेस पडते... तिथे लावलेल्या फलकावरुन कळते की त्या मूर्तीची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी केलेली आहे... बहुतेक गडकिल्ल्यांवर आपल्याला समर्थ स्थापित हनुमंतराय पाहायला मिळतात...

देव टाके 

मंदिराच्या शेजारीच देव टाके आहे... ज्याचे आजही गडावर राहणारे लोक पिण्याच्या पाण्यासाठी वापर करतात... 


कल्याण दरवाजा 


देव टाके पाहून आम्ही कल्याण दरवाजाकडे जाण्यासाठी चालू लागलो... दरवाजा जवळ पोहोचले तर तिथेही दरवाजाचे काम सुरू होते... 





झुंझार बुरुज 

तिथून माघारी फिरून डावी कडे वळून पुन्हा मागच्या दिशेने दक्षिणेला असणाऱ्या झुंजार बुरुजाकडे मार्गक्रमण सुरू ठेवले... पुढच्या दहा पंधरा मिनिटात आम्ही झुंजार बुरूजावर पोहोचले... 




बुरुजाच्या समोरील डोंगररांगेतील स्पष्ट दिसणार्‍या पायवाटा सिंहगड-राजगड-तोरणा (SRT) रेंज ट्रेक साठी खुणावत होत्या... काही जण सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाना-रायगड असा ही ट्रेक करतात... आणि तीन चार दिवसाचा असा ट्रेक करण्याची माझीही खूप इच्छा आहे... 





हत्ती तलाव 

फोटो वैगरे काढून झाल्यावर आम्ही तिथून माघारी फिरलो.. तटबंदीला लागून असलेल्या पायवाटेने पुन्हा पायपीट करीत सुभेदार तानाजी मालुसरे ह्यांच्या समाधीकडे पोहोचले... 




समाधी स्थळाच्या उत्तरेला थोडी चढन चढून गेल्यावर आपण कोंढाणेश्वर शिव मंदिराजवळ येऊन पोहोचतो... मंदिराच्या दरवाजाला कुलूप होते... बाहेरूनच नमस्कार करून शेजारी असलेल्या झाडाच्या सावलीत पाच मिनिटे आराम केला... पाणी पिऊन पुन्हा चालायला लागलो.. 

आमची गडफेरी जवळपास पूर्ण झाली होती... उत्तरेकडे असलेला तोफखाना इमारत आणि तोफ बघायची राहून गेल्याने आम्ही पुन्हा लोकमान्य टिळकांच्या निवासस्थानाकडून तिथे जाणारा रस्ता पकडून चालू लागलो... 




तोफ पाहून झाल्यावर थोडी निसरडी वाट उतरून आम्ही तोफखाना इमारती जवळ आलो... तत्पूर्वी तीन माकडांनी आमचे स्वागत केले... लांबूनच माकडं दिसली तेव्हाच जॅकेट काढून बॅग घातली आणि बॅगेवर पुन्हा जॅकेट... बहुतेक वेळा काही खायला मिळेल ह्या हेतूने माकडं बॅगेवर झडप घालतात... तोफखाना पाहून आम्ही पुन्हा पुणे दरवाजा क्रमांक तीन, दोन, एक करत 12:30 वाजे पर्यंत पार्किंग कडे पोहोचले... गडावर समाधीस्थळाकडे ताक पिले होते आणि आता उतरताना पुणे दरवाजा क्रमांक एक वर ताक पिले... भूक अशी नव्हतीच... वाटेत एखादे हॉटेल बघून जेवण करू अस ठरवलं... अपेक्षेपेक्षा लवकर गड भ्रमंती झाल्यामुळे पुन्हा वेळेचं गणित मांडणी सुरू झाली... आता संध्याकाळी 5:50 च्या एवजी दुपारची 3:23 ची ट्रेन मिळणार होती...जी वसई स्टेशनला 7:45 ला पोहोचवते... त्याआधी जेवणासाठी थांबायचे होते, दादाच्या घरून निघाल्यावर पुन्हा पुणे रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी 13 किलोमीटर चा रिक्षाचा प्रवास होता... 12:40 वाजता आम्ही पार्किंग मधून निघाले... उतरन आणि घाटाचा रस्ता असल्याने तेवढा पॅच सावकाश उतरले... जेवायची इच्छा नव्हती... पुढे ट्रेनचा प्रवास होता रात्री उशिरा पोहोचणार होते, म्हणुन आणि पोटात काहीतरी गेले पाहिजे याकरिता फक्त फ्रूट ज्युस घेऊ अस ठरवून रस्त्याला लागलो... पण पोहोचत आलो तरी एकही फ्रूट ज्युस पिण्या लायक दुकान दिसले नाही.. शेवटी एका हॉटेलात थांबून डाल-खिचडी खाऊन आम्ही दादांच्या घरी पोहचलो... हॉटेलातून निघताना दादांना कॉल करुन कळवल की पाचच मिनिटात आम्ही त्यांच्या घरी पोहोचणार होते आणि ट्रेन पकडण्यासाठी लगेचच निघायचे आहे... त्यांच्या बिल्डिंग कडे पोहोचल्यावर बाइक पार्क करून दादांच्या घरी गेलो... दादा छोट्याला आणायला त्याच्या शाळेत गेलेले, त्यामुळे निघताना त्यांची भेट झाली नाही... आम्ही फ्रेश होऊन निघायच्या तयारीत होते पण आई लिंबू सरबत घेऊन आल्या... आदल्या दिवशी गावाहून आणलेले चिकू आणि रामफळाची पिशवी त्यांनी आमच्या सोबत दिली... वहिनी आणि आईंचा पुढच्या वेळी रहायला या असा आग्रह होता... त्यांचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघाले... रिक्षात बसल्यावर दादांना कॉल करुन आम्ही निघाले असल्याच कळवलं... बहुतेक ठिकाणी सिग्नलला थांबावं लागत असल्याने वाटत होत ट्रेन मिळणार नाही... मोबाईल वरच ऑनलाईन तिकीट काढून घेतलं आणि स्टेशन वर पोहोचे पर्यन्त ट्रेन चे स्टेटस चेक करत होतो... प्लॅटफॉर्मवर पोहोचल्यावर पुढील 2/3 मिनिटात ट्रेन आली सुद्धा... पुन्हा जनरल मधे जायच ठरवल, सीट मिळाली नाही तर पुढच्याच स्टेशनला उतरुन स्लीपर डब्यात जाऊ अस ठरवलं... गर्दी असल्यामुळे ट्रेन थांबत असतानाच चालत्या ट्रेन मधे चढून सीट पकडायची होती... चढल्यावर खालील सर्व सीट फुल्ल होत्या, त्यामुळे वर बसायची वेळ आली... पण गर्दी पाहून कळलं की खाली बसण्यापेक्षा वरच्या सीटवर बसणेच फायदेशीर होते... 7:45 वाजता वसईची वेळ असणारी ट्रेन 8:30 वाजता वसईला पोहोचली... त्यामुळे विरार वरुन 8:30 वाजता सुटणारी डहाणू लोकल मिळणार नव्हती... वसईला 8:40 ला असणारी पनवेल-डहाणू मेमू सुद्धा एक तास लेट... दुष्काळात तेरावा महिना... शेवटी 9:30 वाजता डहाणू कडे जाणारी लोकल पकडून आम्ही 10:40 ला पालघरला पोहोचले... उशीर होणार होता म्हणुन घरी कळवून ठेवलेलं... पालघरला हॉटेलात जेवून आम्ही 11:20 पर्यन्त  सुखरूप घरी पोहचलो...

‎भेटूया लवकरच पुढच्या भटकंती मधे...

‎तुम्हाला ही भटकंती कशी वाटली... नक्की कळवा?


‎अक्षय किणी

‎IG - akshaykini123







No comments:

Post a Comment