१४ जानेवारी मकर संक्रांतीची सुट्टी...मागच्या वर्षी मकर संक्रांत आणि सोमवार (माझा सुट्टीचा वार) लागोपाठ आल्याने तुषार दादा आणि मी नाशिक मधील बितनगड, औंढा किल्ला आणि पट्टा किल्ला (विश्रामगड) असे तीन किल्ले केले होते...श्री वज्रेश्वरी पालखी सोहळ्याला जात असताना तुषार दादा आणि परु सोबत ह्याही वर्षी जाण्याच ठरवलं... फक्त जाण्याच ठरवलं... कुठल्या किल्ल्यावर जायच, कधी निघायचं ह्याची प्लॅनिंग करायची होती... तर आदल्या दिवशी दादा चा कॉल आला - आईला हॉस्पिटल ला घेऊन जायच असल्यामुळे त्यांना जमणार नव्हत... परू ला विचारून पाहिल - त्यालाही घरी काम होत... मग एकटाच जायच ठरवलं... सागरला सुट्टी आहे का विचारण्यासाठी कॉल केला पण त्यालाही जमणार नव्हत.. मग त्याच्या कडूनच कळल one day मधे कर्नाळा किल्ल्यावर जाऊन येऊ शकतो... ठरलं... पनवेलचा कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि कर्नाळा किल्ला... First Solo Trek...कर्नाळा किल्ल्याचा सुळका किल्ल्याचे विशेष आकर्षण आहे... हा सुळका अंगठ्यासारखा दिसतो....तसेच या किल्ल्याच्या परिसरातील कर्नाळा पक्षी अभयारण्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे....
सकाळी ६ वाजताची पनवेल मेमू पकडण्यासाठी ५:३० वाजता निघालो... ट्रेन रिकामीच होती... पनवेल पर्यन्त पुस्तक वाचत वेळ कसा गेला समजल नाही... ९ वाजता पनवेल... स्टेशनातून बाहेर पडून बस डेपो कडे जायला ५/१० मिनिटे चालावे लागते...पेणला जाणारी बस पकडून map लावला... कर्नाळा पक्षी अभयारण्य महामार्गाला लागूनच असल्याने बस मधून उतरल्यावर दुसरे वाहन करायची गरज लागत नाही... तरीही बस खूप पुढे थांबल्यामुळे ५/१० मिनिटे मागे चालत यावे लागले... ट्रेक तिथूनच सुरू झाला म्हणा...
पक्षी अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी आणि किल्ल्यावर जाण्यासाठी ६० रुपयाची पावती फाडून जावे लागते... पुढे एक महिला पोलीस कॉन्स्टेबल बॅग चेक करून आत मधे दारू, सिगारेट, स्पिकर तर नाही ना चेक करून प्लॅस्टिक पाण्याची बॉटल गडावर न टाकण्याची ताकीद देतात... वरील पैकी एकही वस्तू माझ्याकडे नसल्याने मला इतरांप्रमाणे तिथे थांबावे लागले नाही... १० वाजले होते.. शेजारीच असलेल्या प्रवेशद्वारासमोर फोटो काढून, श्री गणेशाला आणि शिवछत्रपतींना स्मरूण गडचढाईला सुरुवात केली....
रस्त्याच्या दुतर्फा अभयारण्यात असलेल्या पक्ष्यांच्या माहितीचे फ्लेक्स लावले आहेत... ५/१० मिनिटांचा डांबरी रस्ता संपल्यावर चढण सुरू होते.. थोड पुढे गेल्यावर समजल की गडावर एक मुलगा चक्कर येऊन पडला होता... तिथल्या लोकल रेस्क्यू टीमच्या साहाय्याने त्याला खाली नेत होते... फार गंभीर दुखापत झाली नव्हती... पडणारा मुलगा आसपासचाच होता... कॉल केल्या नंतर त्याचे वडील लगेचच आले होते... रेस्क्यू टीम सोबत तेही होते...तिथल्या एका मुला कडून समजले की तो रिकाम्या पोटी गड चढत होता.. तर गड्यांनो कुठे ट्रेकिंग साठी जाताना रिकाम्या पोटी जाऊ नका...तसेच पुरेसे पाणी, खाऊ किंवा energy drink (ORS / Glucon D) सोबत बाळगा... जिथे जाणार असतिल त्याची प्रॉपर माहिती घरच्यांना द्या...
चढताना काळदुर्गची आठवण येत होती... बरेचसे पॅच काळदुर्ग चढताना दिसतात तसेच होते...अर्ध्या अर्ध्या तासाने ५ मिनिटे थांबावं लागत होत.. सूर्यदेव बराच वर आल्याने उन्हाचा दाह जाणवत होता... पक्षी अभयारण्य असल्याने साहजिकच अधूनमधून पक्ष्यांचा मधूर किलबिलाट ऐकू यायचा... किल्ला दोन स्तरात आहे.. जवळपास तासभर चढाई केल्यानंतर पहिल्या स्तरावरून सुळका दिसायला लागला... त्याला पांडव बुरुज देखील म्हणतात... आणखीन पुढे गेल्यास गडावरील एकमेव कर्णाईमाता मंदिर नजरेस पडते....पुढे छोटे छोटे चढ उतार गेल्या नंतर आपण गडाच्या पहिल्या दरवाजापाशी येतो.. ज्याचा बराच भाग उध्वस्त झाला आहे.... पुढे गेल्यावर थोडा चढ चढून आपण पोहोचतो तटबंदी युक्त बुरूजावर...दोन्ही बाजूंना रेलींग लावल्यामुळे चढायला सोप जातं.... त्या बुरुजातून आत गेल्यास आणखीन एक दरवाजा युक्त बुरुज आहे... ज्याला सुरेख दरवाजा बसवला आहे... त्या दरवाज्यातून वर चढून आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचतो... जिथे जुना वाडा, सुळक्याच्या खाली असलेले पाण्याचे टाके, तटबंदी मधील जंग्या, दगडी कमान पाहायला मिळते... सुळक्याच्या पुढे चालत गेल्यावर एक दरवाजा लागतो जो समोरच्या बुरुजावर जाण्यासाठी आहे... दरवाजा उतरुन समोरच्या बुरुजावर आणखीन एक दरवाजा लागतो त्याच्या बाहेरच्या बाजूने दोन शरभ शिल्प कोरलेले दोन दगड बसवलेले आहे... दरवाजा उतरून आपण समोरच्या बुरुजावर जातो... बुरुजावर एक छोट पाण्याच टाकं, शेवटच्या घटका मोजत असलेली तटबंदी ज्यात जंग्या आणि एक शौचकुप आहे... इथ पर्यंत पूर्ण किल्ला पाहून होतो... कर्नाळा किल्ल्याचा इतिहास यादव काळापासून सुरू होतो, जो देवगिरी यादव, तुघलक, निजामशाही, मराठे आणि शेवटी ब्रिटिश यांच्या अधिपत्याखाली राहिला... छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये तो जिंकला पण पुरंदरच्या तहानुसार मोगलांना द्यावा लागला... त्यानंतर मराठ्यांनी तो परत मिळवला आणि १८१८ मध्ये ब्रिटिशांनी कर्नल प्रॉथरच्या नेतृत्वाखाली तो जिंकून घेतला...
पनवेल वरुन २:३५ ची मेमू पकडायची होती जी ४:१० पर्यन्त वसईला पोहोचते... त्यामुळे गड पाहून झाल्यावर १२:१५ वाजता गड उतार व्हायला सुरुवात केली... एकटाच असल्याने कुठेही न थांबता पाऊणतासात मुख्य प्रवेशद्वार जेथून ट्रेकची सुरुवात केलेली तिथे पोहोचलो...उतरताना वाटेत हरणं दिसली... "ट्रेक कसा झाला, पुन्हा कधी येणार" विचारत होती... "येत्या पावसाळ्यात येऊ" (कदाचित) बोलून, निरोप घेऊन मी वाटेला लागलो... शेजारी असलेल्या महामार्गावर बस ची वाट पाहत असताना पनवेलला जाणारी इको समोर थांबली... ट्रेनच्या वेळेच्या एक तास आधीच स्टेशनात पोहचलो... फ्रेश वैगरे होऊन वसईला जाणारी मेमू कुठल्या प्लॅटफॉर्म वर लागणार ह्याची खात्री करून प्लॅटफॉर्म नंबर ७ वर जाऊन पोहचलो... काही वेळाने ट्रेन आली आणि परतीचा प्रवास सुरु....





















































No comments:
Post a Comment