Friday, 27 July 2018

रांगोळी आर्ट

                                                                         

  रांगोळी
                   कलेची आवड असल्याने साहजिकच रांगोळी काढायची सुद्धा आवड होतीच. पण योग्य मार्गदर्शन नव्हत त्यामुळे जस जमेल तस रांगोळी काढायचा. पुर्ण वर्षातून दिवाळीचे २/३ दिवस तेवढे मिळायचे रांगोळी काढण्यासाठी... त्यात पण बहीणीच आणि माझ भांडण व्हायच... तीलाही रांगोळी काढण्याची (संस्कारभारती) भारी हौस....एक दिवस ती रांगोळी काढणार एक दिवस मी काढणार... हे दरवर्षी ठरलेलच... तीच लग्न होऊन २ दिवाळी गेल्या... रांगोळी काढण्यासाठी तिन्ही दिवस माझ्याकडे असतात पण आता मलाच वेळ मिळत नाही... लक्ष्मी पुजनच्या दिवशी अॉफिसात बोलवतात आणि पुढचा दिवस युवा मांगेला ग्रुपचे रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेच आयोजनात जातो... भाऊबीजेला पुर्ण दिवस बिझी ... ह्या दिवशी कफपरेड, घोलवड, अल्याळी, सातपाटी आणि शिरगाव... अशी वारी असते... असो..
           फेसबुक, व्हाट्सअप वर ज्युचंद्र येथील रांगोळीकारांचे रांगोळी पाहायचो... डोळ्यांवर विश्वासच बसायचा नाही, असे रांगोळी असायचे... तेव्हाच ठरवलं, आपणही पोर्ट्रेट रांगोळी शिकायला पाहिजे... याआधी मी रांगोळी काढायचो ते संस्कारभारतीचे रांगोळी कलरनेच... तेव्हा माहितीही नव्हते की पोर्ट्रेट रांगोळी साठी लेक कलर वापरतात... आणि लेक कलर कसे असतात तेही कधी पाहीले नव्हते...
       एव्हाना माझ सर्च इंजिन सुरू झालं... गुगलवर खुप सर्च केले... कुठे हॉबी क्लासेस आहेत का तेही पाहिल...(हॉबी क्लासेस अश्या साठी की जॉब करूनही रांगोळी शिकता यावी)... फेसबुकवरही रांगोळीकार पाहिले... २/३ जणांना फ्रेंडरिक्वेस्ट पाठवली... (त्यांनी केलेल्या रांगोळ्या बघूनच)... रिक्वेस्ट पाठवण्याचा एवढाच हेतू होता की, त्यांनी कधी त्यांच्या रांगोळीचे फोटो अपलोड केले तर आपल्यालाही दिसतील... त्यातुनच थोडफार शिकता येण्यासारख मिळाल तर.. रांगोळीचे विषय, त्यांची निवड वैगरे वैगरे....तर रिक्वेस्ट पाठवलेल्यां पैकी एक म्हणजे #साहील_चव्हान.... (माझा रांगोळीचा गुरू) हा मुळचा रत्नागिरीचा... आधी मालाडला राहायचा... आता मुलूंडला राहतो...(अहो जाहो नाही करत.. कारण आता आम्ही चांगले मित्र आहोत.) त्याच्या रांगोळी म्हणजे बाप काम...चित्रातील अगदी बारीक बारीक कामही रांगोळीत सुबकपणे रेखाटतो... वयाने माझ्यापेक्षा लहान आहे... अजूनही आर्ट साठी लोकप्रिय असलेल्या जे. जे. आर्ट कॉलेज मधे शिकतो... शनिवार, रविवारी क्लासेस घेतो... काही महिन्यांनी त्यांने पोस्ट अपलोड केली.. रांगोळीचे क्लासेस सुरू करणार होता तो.... मोबाईल नंबर सोबत दिला होता... मी लगेचच कॉल करुन रांगोळी क्लास संबंधी चौकशी केली.. मे महिन्यापासून क्लासला जायच ठरल..
      रविवार, दिनांक ०८ मे २०१७ पासुन क्लासला सुरुवात झाली... परळ येथील शिरोडकर हायस्कूल मधे क्लास असतो.. टाईम - सकाळी १० ते १ पर्यंत... सकाळी वलसाड पॅसेंजरने जायचो आणि येताना अहमदाबाद पॅसेंजर मिळायची... क्लासला येताना काय काय मटेरियल घेऊन यायच ते व्हाट्सअप केल होत... पहीलीच रांगोळी असल्याने पक्ष्याच चित्र कलर प्रिंट आणि ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आणायला सांगितल होत.. तसेच ब्राऊन पेपर, स्केल, पेन्सिल, रांगोळीचे हात पुसायला कपडा आणि हात धुवायला साबण.... मी कबूतराच चित्र कलर प्रिंट नेल होत... पहिल्या दिवशी चित्राच स्केच काढायला सांगितल... तेही ब्राऊन पेपरवर ग्राफ्स आखुन... पहीला रविवार ग्राफ्स आखण्यात आणि स्केच काढण्यातच गेला... नंतर साहील आम्हाला रांगोळीचे लेक कलर आणण्यासाठी घेऊन गेला... १५ कलरचे शेड घेतले... पुढच्या रविवारी तेच कलर घेऊन यायला सांगितलं... आठवडाभरापासून मला वेध लागले होते... ह्या रविवारी रांगोळी काढायला, शिकायला मिळणार.... पण नाही......त्या रविवारी लेक कलर घासायचे होते... हो ते घासावे लागतात... आपली नेहमीची सफेद रांगोळी चाळून जी पावडर शिल्लक राहते... त्यामधे घासायचे असतात.... मुठभर सफेद रांगोळी आणि एक चमचा लेक कलर.... हे चांगलं भार देऊन घासाव लागते... मुठभर रांगोळी घासायला जवळपास अर्धा ते पाऊण तास लागतो... असे १५ कलर घासायचे होते... त्या रविवारी फक्त जेमतेम दोन कलर घासून झाले... नंतर आठवडाभर जसे जमेल तसे लेक कलर घासून पुर्ण केले...
         तिसर्‍या रविवारी ब्लॅक अँड व्हाईट रांगोळी करायची होती... म्हणुन दोनच (ब्लॅक अँड व्हाईट) कलर घेऊन यायला सांगितले होतं... अगोदर ज्यावर स्केच केल होत तो ब्राऊन पेपर... जमिनीवर पेस्ट करावा लागतो... त्याने सुरुवातीला रांगोळी टाकण्याच्या पद्धती दाखवल्या... नंतर रांगोळी काढायची सुरूवात केली... त्याची शिकवण्याची पद्धत खुपच मस्त आहे.. अगदी सहज, सोपी, कोणालाही लगेच आत्मसात करता येईल अशी... त्याच्या बद्दल आणखी एक सांगायच म्हणजे.... तो हातच काहीच राखून ठेवत नाही.. आपणांस जे जे ठावे | ते इतरांस सांगावे || शहाणे करून सोडावे | सकल जण ||... अशी त्याची वृत्ती...(अगदी बारीक बारीक गोष्टीही खुप समजावून सांगतो... चित्रातले कलर कसे ओळखायचे, कलर मिक्स कसे करायचे, रांगोळी काढताना कलर ठेवण्याची पद्धत, आपली बसण्याची पद्धत, रांगोळी वर एखादा पाखरू किंवा किटक पडला तर तो अलगद कसा काढायचा... असे एक ना अनेक) 
         काही जणांची वृत्ती असते हातच राखून ठेवायच, किंवा आपल्याला जे येते ते समोरच्याला आल नाही पाहिजे... अशी २/३ मंडळी मी माझ्या आयुष्यात अनुभवली आहेत... असो.....
            चौथा रविवार होता कलर रांगोळीचा... त्याअगोदर आठवडाभर ब्लॅक अँड व्हाईट रांगोळीचा सराव करत होतो... सराव सुटला की रांगोळी व्यवस्थित, पाहिजे तशी पडत नाही... चिमटी मधे रांगोळी पकडून बारीक बारीक लाईन मारणे खुपच किचकट... त्यात पहीलच चित्र पक्ष्याच असल्याने पिसे काढण्यासाठी लाईनचाच वापर जास्त होता... साहीलच्या म्हणण्यानुसार त्याने पहीलच चित्र पक्ष्याच मुद्दामच दिलं... जेणेकरून चिमटीने लाईन काढण्यासारख्या किचकट कामात आमचा हात बसेल...
         कलर रांगोळीची सुरुवात झाली... त्याने सुरुवात करून दाखवली.. आधी बॅकग्राऊंड करुन नंतर मुळ अॉब्जेक्टवर काम करायच... पक्ष्याची चोच, डोके, डोळे आणि मान काढून त्याने पुढच काम मला करायला सांगितल... ब्लॅक अँड व्हाईट रांगोळीची थोडी सवय होतीच... तरीही पहीलीच कलर रांगोळी असल्याने कलर मिक्स करण्यात अडचणी येत होत्या... जसेतसे पाठीवरचा भाग आणि पंखांचा भाग पुर्ण केला... नंतर पायाकडे आलो... पाय एवढे लहान होते की तिथे रांगोळी टाकायला जमत नव्हतं... पायावर सावली पडल्याने ३/४ प्रकारचे शेड होते.. तेही मला जमल नाही... पुन्हा त्याने पायांचा भाग करून दाखवला... त्या तेवढ्याच भागात एवढ काम होत की त्याच्यात अर्धा ते पाऊण तास गेला... तुम्ही त्या फोटोला झूम करून पाहू शकता... अगदी हुबेहुब पाय वाटत होते... अर्थातच ते काम साहीलने केल होत म्हणुन प्रश्नच नाही... अश्या प्रकारे चौथा रविवारही गेला...



           
पाचव्या रविवारी पोर्ट्रेट रांगोळी ला सुरुवात होणार होती... जे मला शिकायच होत... यावेळी येताना लहान मुलाच चित्र घेऊन यायला सांगितलं... मी ज्यांच्याकडे प्रिंट मारतो (जितू भाऊ) , त्यांच्या मुलाची एक प्रिंट घेतली आणि एक माझी भाची श्रेयाची... श्रेयाच्या प्रिंटमधे जास्त शेड्स नव्हते म्हणून साहिलने भार्गव (जितू भाऊचा मुलगा) ची रांगोळी काढायची सुचवलं... पुन्हा ग्राफ्स, पुन्हा स्केच... पहीला रविवार ग्राफ्स आणि स्केच... दुसरा रविवार ब्लॅक अँड व्हाईट रांगोळी... तिसरा रविवार कलर रांगोळी... हे ठरलेलच असायच...                 
             
             मध्यंतरी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची रांगोळी काढली होती... आषाढी एकादशीचा योग पण होता आणि त्यानिमित्ताने प्रॅक्टिसही... दुग्धशर्करा योग काय म्हणतात ते... असो.... तर घरी कोबा असल्याने जितू भाऊंच्या घरीच रांगोळी काढली होती... फरशीवर स्केच केलेला कागद चांगल्या पद्धतीने पेस्ट करता येतो त्यामुळे त्यांच्या घरीच काढण्याच ठरवलं.... शिकाऊ असल्याने त्या रांगोळीमधे पाहिजे तसा गोल्डन इफेक्ट देऊ शकलो नाही...
               
आधी पक्ष्याची, मग लहान मुलाची आणि आता विषय होता स्वतःची रांगोळी... Self Portrait Rangoli... स्वतःची रांगोळी काढण्यास खुप उत्सुक होतो... क्लास मधे वेळ नको जायला म्हणून घरीच ग्राफ्स आणि स्केच केल... क्लासमधे पुन्हा स्केचवर रेंडरींग केल... ब्लॅक अँड व्हाईट रांगोळी असली की बर वाटायच... एकतर इतर कलरचे ओझे घेऊन जायला लागत नाही आणि दोनच कलर असल्याने मिक्सिंग करताना वेळही जात नाही... बॅकग्राऊंडने रांगोळी टाकायला सुरुवात तर केली पण माझे कुरळे केस असल्याने, रांगोळीत ते कसे दाखवायचे हे जमत नव्हतं...
             पुन्हा साहिलला सांगुन त्याच्या कडुन समजून घेतलं... आणि एवढ मस्त काम झाल की मलाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता... त्यादिवशी केस, कपाळ आणि डोळ्यांचा भाग पुर्ण केला... दुसर्‍या रविवारी उर्वरित भाग पुर्ण केला.... स्वतःची रांगोळी स्वतः काढणे आणि तेही पोर्ट्रेटची सुरुवात - खुप मस्त वाटत होतं...
खरी कसोटी होती ती म्हणजे पुन्हा तेच पोर्ट्रेट कलर रांगोळीने काढायच होत... पुन्हा कलर मिक्सिंग, ते मॅच करण कठीण जात होत... साहील वेळोवेळी मार्गदर्शन करत होताच.. त्यामुळेच रांगोळी पुर्ण करू शकलो...
              बघता बघता दिवाळी जवळ आली होती... कारण मधे क्लासला जायचा गॅप पडला होता... कारण जॉब करत असल्याने गणपतीच्या डेकोरेशनच्या कामात वेळ देता येत नव्हते... म्हणुन रविवारचा क्लासचा वेळ डेकोरेशनच्या कामी लावायचा ठरवलं...

          तर सांगायचा मुद्दा असा की, दिवाळी जवळ आली होती आणि दिवाळीच्या निमित्ताने सातपाटी येथे श्रीराम मंदिरात रांगोळी स्पर्धेच आयोजन केल जाते... तर त्या रांगोळी स्पर्धेत मला सहभागी व्हायचे होते... सातपाटीचे सुपुत्र, क्रांतीकारक काशिनाथ पागधरे ह्यांची रांगोळी रेखाटण्याच पक्क केल होत... त्याचा सरावही केला होता... पण काही कारणास्तव मागील वर्षी स्पर्धेच आयोजन केल नाही... थोड दु:ख झाल... पण तेवढ्याच पुरत... कारण दोन वर्षापासून युवा मांगेला ग्रुपच्या वतीनेही रांगोळी स्पर्धेतच आयोजन केलं जाते...


त्यासाठी २ रांगोळीवर सराव केला होता... एक म्हणजे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी आणि दुसरी एम एस धोनी...
त्यापैकी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी ह्यांची रांगोळी काढली... माझी पहिलीच पोर्ट्रेट रांगोळी.. जी मी कलर रांगोळीने पुर्ण केली... ती रांगोळी पुर्ण करायला मला जवळ जवळ ९ ते १० तास लागले... महत्त्वाच म्हणजे जराही विश्रांती न घेता... रांगोळी क्लास लाऊन सार्थक झाल्यासारख वाटत होतं... त्यानंतर ती रांगोळी प्रदर्शनात जवळपास आठवडाभर होती... मी प्रत्येक दिवशी जाऊन पुन्हा पुन्हा पाहायचो...प्रत्येक वेळी नव्याने पाहायचो.. मला स्वतःला विश्वास बसत नव्हता की मी स्वतः काढली आहे... (ती रांगोळी एकदम परफेक्ट म्हणण्यासारखी निश्चितच नव्हती.. पण क्लास सुरू होऊन फक्त ३ रांगोळ्या झाल्या होत्या... आणि त्या कालावधीत जेवढ शिकायला मिळाल त्या मानाने रांगोळी खरच चांगली झाली होती) ... निश्चितच ह्याच श्रेय साहीलला जाते... एवढ्या कमी कालावधीत बर्‍यापैकी शिकवलं होतं... (क्रमशः)
  










CM चषक , पालघर विधानसभा - येथे काढलेली रांगोळी - नरेंद्र मोदी 






दिवाळीमधे (२०१९) - काढलेली रांगोळी - #श्रेया 




रोटरी क्लब ऑफ पालघर आयोजित रांगोळी स्पर्धेत काढलेली रांगोळी 



रांगोळीची पहिली ऑर्डर - सेवानिवृत्त समारंभ - वाणगाव


अयोध्या राम मंदिर - प्राण प्रतिष्ठा सोहोळ्या निमित्त - 22 जानेवारी 2024




25 comments:

  1. Awesome bro
    Keep it up
    All d very best

    ReplyDelete
  2. खरंच खूप छान लिहिलं आहे तू.
    खूपच छान रांगोळी काढतोस तू,
    अश्या रांगोळी तू नेहमीच काढत जा
    आणि तुझ्यातले कलागुणांना चांगला वाव देत रहा
    👌👌👌👌

    ReplyDelete
  3. खूपच छान प्रवास मित्रा
    खूप खूप शुभेच्छा💐💐
    अप्रतिम आहेत रांगोळ्या👌👌👌
    बडते रहो

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद नितेश भाऊ 🙏

      Delete
  4. खुप छान भावा....
    खुप खुप शुभेच्छा...
    बढ़ते रहो...

    ReplyDelete
  5. मनापासून शुभेच्छा भावा तुझ कौतुक करावं तितकं कमीच..पण मला खूप अभिमान वाटतो जेव्हा तु तुझी ओळख कलेतुन दाखवतो.. आणि यात काही शंकाच नाही की तु आता नुसता अक्षय कीणी राहीला नाहीस तर आर्टिस्ट अक्षय कीणी म्हणून ओळखला जातोय...तुझी अशीच यशस्वी वाटचाल सुरू राहो हीच ईश्वरचरणी चरणी प्रार्थना आणि महत्वाचं म्हणजे मला तूझ्या नावावर थोडा भाव खाता येतो...

    ReplyDelete
    Replies
    1. अरे किती हे कौतुक 😂... धन्यवाद धन्यवाद 🙏

      Delete
  6. Awesome भावा👌👌
    अभिमान आहे आम्हाला तुझा
    Thanks being my best friend😘😘

    ReplyDelete
  7. Khup Chaan Akshay. 👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  8. खूपच सूंदर ।।।। अप्रतिम ।।। भावी वाटचालिस खुप खुप शेभेच्छा ।।।

    ReplyDelete
  9. छान आहे मित्रा... शुभेच्छा !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मित्रा 🙏

      Delete
  10. अप्रतिम रांगोळ्या आणि लिखाण दोन्ही..👌👌👌👌

    ReplyDelete
  11. Khup khup Sundar Rangoli art ahet Akshay..god may always blessed you...khup khup Pragati Kar....

    ReplyDelete
  12. खूप छान दादा 👐🙌👍💐👌👌👌💐💐

    ReplyDelete